बारसू परिसरात जमावबंदी लागू
By अरुण आडिवरेकर | Published: April 23, 2023 04:58 PM2023-04-23T16:58:25+5:302023-04-23T16:59:14+5:30
या परिसरात २ हजार पाेलिसांची कुमक तैनात करण्यात आली आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क, राजापूर : राजापूर बारसू सोलगाव परिसरात प्रस्तावित असलेला रिफायनरी प्रकल्पासाठी माती परीक्षणाच्या सर्वेक्षणाची सुरुवात सोमवार (२४ एप्रिल)पासून केली जाण्याची शक्यता आहे. रिफायनरी प्रकल्प विरोधी संघटना आणि काही ग्रामस्थांकडून या कामात अडथळा आणण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राजापूर बारसू सोलगाव या परिसरात राजापूरच्या तहसीलदार शीतल जाधव यांनी २२ एप्रिल ते ३१ मे २०२३ पर्यंत जमावबंदी आदेश जारी केले आहेत. तर या परिसरात २ हजार पाेलिसांची कुमक तैनात करण्यात आली आहे.
या भागात ड्रिलिंग करून माती सर्वेक्षण सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सगळ्या परिसरात फाैजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १४४(१,२ व ३) प्रमाणे जमावबंदी लागू केली आहे. बारसू सडा बारसू, पन्हळे तर्फ राजापूर, धोपेश्वर, गोवळ, वरचीवाडी गोवळ, खालचीवाडी गोवळ या ड्रिलिंग करण्यात येणाऱ्या एक किलोमीटरच्या परिसरात हे आदेश लागू असणार आहेत. भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लि., हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लि. यांच्या संयुक्त विद्यमाने राजापूर तालुक्यात क्रूड ऑईल रिफायनिंग करणारी ‘रत्नागिरी रिफायनरी व पेट्रोकेमिकल उद्याेग’ प्रस्तावित आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाद्वारे हा प्रकल्प राजापूर तालुक्यातील बारसू, गोवळ, धोपेश्वर तसेच नाटे या परिसरात नियोजित आहे.
बारसू परिसरात औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्याकरीता जमीन योग्य आहे किंवा कसे? याकरीता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून प्राथमिक सुसाध्यता तपासणी करण्यासाठी ड्रोन सर्वेक्षण व भू सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले होते. त्यावेळच्या कालावधीत ‘रत्नागिरी रिफायनरी व पेट्रोकेमिकल उद्याेग’ प्रकल्प विरोधी भूमिका घेऊन हे काम बंद पाडण्यात आले हाेते. पुन्हा सर्वेक्षणाचे काम हाती घेताना ग्रामस्थांच विराेध पाहता या भागात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"