जन आशीर्वाद यात्रेच्या अनुषंगाने जिल्ह्यात मनाई आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:37 AM2021-08-25T04:37:05+5:302021-08-25T04:37:05+5:30
रत्नागिरी : केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांची २३ ते २५ ऑगस्ट या कालावधीत रत्नागिरी ...
रत्नागिरी : केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांची २३ ते २५ ऑगस्ट या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यात जन आशीर्वाद यात्रा चालू आहे. यात्रेदरम्यान तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे तसेच ३० ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी व ३१ ऑगस्ट रोजी गोपाळकाला असे उत्सव साजरे होणार आहेत. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने २४ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते ३१ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजेपर्यंत जिल्ह्यात मनाई आदेश जारी केला आहे.
ही परिस्थिती लक्षात घेता, रत्नागिरी जिल्ह्यात कोणत्याही प्रसंगी क्षुल्लक कारणावरुन झालेल्या घटनांचे पडसाद उमटून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याकरिता जिल्ह्यात मनाई आदेश जारी करण्यात आला आहे. त्यानुसार २४ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजल्यापासून ३१ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजेपर्यंत जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. या आदेशान्वये शारीरिक दुखापत करणारी हत्यारे, तलवारी, बंदुका, सुरे, लाठ्या अगर कोणतीही वस्तू, दाहक किंवा स्फोटक पदार्थ, दगड किंवा इतर शस्त्रे, हत्यारे किंवा शस्त्रे फेकावयाची साधने बरोबर घेऊन फिरणे, गोळा करणे किंवा तयार करणे, प्रक्षोभक भाषणे करणे, शव किंवा आकृती यांच्या प्रतिमांचे प्रदर्शन करणे, सार्वजनिक घोषणा, गाणी गाणे, वाद्य वाजविणे, पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी विनापरवानगी एकत्र येणे या कृत्यांना मनाई करण्यात आली आहे.
हे आदेश अंत्ययात्रा, धार्मिक विधी, धार्मिक मिरवणूक, लग्नसोहळा, सामाजिक सण, शासकीय कार्यक्रम, शासकीय सेवेत तैनात कर्मचारी यांना लागू होणार नाही, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
प्रतिबंधात्मक आदेशाच्या काळात कोणताही मोर्चा, मिरवणुका तसेच सभा निवडणूक प्रचार सभेचे आयोजन करावयाचे झाल्यास संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे, असे जिल्हादंडाधिकारी यांनी या आदेशात नमूद केले आहे.