प्रकल्प रेंगाळलेलेच!
By admin | Published: November 19, 2014 09:17 PM2014-11-19T21:17:36+5:302014-11-19T23:17:55+5:30
चिपळूण पालिका : कारभाराबाबत नागरिकांमध्ये नाराजी
चिपळूण : येथील नगर परिषदेचा कारभार म्हणजे आंधळं दळतयं आणि कुत्र पीठ खातयं... असाच आहे. शहरातील अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प अद्याप मार्गी लागलेले नाहीत. त्यामुळे नगर परिषदेचे उत्पन्न वाढत नाही. अनेक कामे दर्जाहीन, निकृष्ट होत असल्याने पैसे वाया जात आहेत. याबाबत नागरिकांमध्ये नाराजी आहे.
१०० टक्के कचरामुक्त शहर म्हणून चिपळूणचा गौरव आहे. या शहरात बऱ्यापैकी स्वच्छता आहे. सध्या कचराकुंड्या नसल्याने घंटागाडीच्या माध्यमातून कचरा उचलला जातो. यासाठी कंत्राटी कामगार व नगर पालिका कर्मचारी कार्यरत आहेत. काही कामगार व कंत्राटी कामगार कामावर आहेत की नाहीत, याबाबत कोणाला फारशी माहिती नसते. शिवाय कामावर असणारे कर्मचारी समाधानकारक काम करत नाहीत. त्यांच्यावर कोणाचा अंकुश नाही, अशी नागरिकांची तक्रार आहे. उद्यानांच्या डागडुजी व व्यवस्थापनासाठी नगर पालिका खर्च करते. परंतु, उद्यानांची स्थिती आजही भकास अशीच आहे. शहरातील क्रीडांगणाची स्थिती तर भयावह आहे. या क्रीडांगणाचा खेळापेक्षा मद्यपान व इतर गोष्टींसाठी अधिक वापर केला जातो. त्याच्यावर कोणाचे नियंत्रण नाही. मैदानाच्या आवारात मद्याच्या बाटल्या पडलेल्या असतात. रामतीर्थ तलाव परिसरात पर्यटन विकास आराखड्याच्या माध्यमातून झालेले कामही निकृष्ट आहे. येथील भिंती खचल्या होत्या. तेथे बांधण्यात आलेल्या झोपड्या अद्याप हटवण्यात आल्या नाहीत. भाजी मंडई, मटण मार्केट अशा महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची कामे रेंगाळली आहेत. हे प्रकल्प सुरु न झाल्याने पालिकेच्या उत्पन्नात घट होत आहे. नव्याने सुरु असलेल्या कोट्यवधी रुपयांची पाणी योजना अद्याप कार्यान्वित नाही. मटण मार्केट व मच्छी मार्केटमध्ये व्यापारी येणार नसतील तर पालिकेचे उत्पन्न वाढणार कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पालिकेतील अनेक कामात मनमानी केली जाते. मर्जीतील ठेकेदारांना कामे दिली जातात. त्यांच्या कामाचा दर्जा राखला जात नाही. काही वेळा तीचतीच कामे नाव बदलून केली जातात. अशा गोष्टी सभागृहात आल्या आहेत. जनरेटर खरेदीचा घोटाळाही यापूर्वी सभागृहात गाजला होता. शहराचा २० कोटीपेक्षा जास्त अर्थसंकल्प असतो. अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार काम होताना दिसत नाही. शिवाय हा पैसा जातो कुठे, हा प्रश्नच आहे. नगरपालिका अनधिकृत बांधकाम, अनधिकृत हातगाड्या किंवा इतर साहित्य जप्त करते. हे जप्त केलेले साहित्य परस्पर विकले जाते. पालिकेने २५ लाखांच्या कचराकुंड्या काही वर्षांपूर्वी खरेदी केल्या होत्या. त्या कुठे गेल्या, हाही संशोधनाचा प्रश्न आहे. (प्रतिनिधी)
आंधळं दळतंय... कुत्रं पीठ खातंय...
१०० टक्के कचरामुक्त शहर.
शहरातील अनेक प्रकल्प अपूर्ण.
वाहन, कचरा, पाणी योजनांचा गोंधळी कारभार.
मर्जीतील ठेकेदारांना काम दिल्याने कामाचा दर्जा खालावला.
मटण मार्केट व मच्छी मार्केट बंद असल्याने उत्पन्नात घट.
मंडई मोकळी; रस्त्यावर बाजार अशी स्थिती.
सांडपाणी, मैला प्रक्रिया न करताच थेट जातो नदीत.
एकूणच पालिकेचा कारभार दिवसेंदिवस खालावत चालला आहे. विविध खात्यांचे प्रमुख, त्यांच्या हाताखाली कार्यरत असणारे अधिकारी कर्तव्यात कसूर करीत असल्याने किंवा कामात चालढकल करीत असल्यामुळे त्याचा लाभ इतरांना मिळतो. पर्यायाने नागरिकांसाठी असणाऱ्या अनेक सोयीसुविधा त्यांना मिळत नाहीत आणि यातूनच नागरिकांचा उद्रेक वाढतो. नगर पालिकेतील सत्ताधारी किंवा विरोधक आपापल्या मतावर ठाम न राहता एखाद्या गोष्टीकडे डोळेझाक करतात आणि यातूनच भ्रष्टाचाराला खतपाणी घातले जाते. या गोष्टी नियंत्रित व्हायला हव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.