प्रकल्पग्रस्तांची अभियंत्यांनी घेतली भेट
By Admin | Published: February 2, 2016 11:42 PM2016-02-02T23:42:10+5:302016-02-02T23:42:10+5:30
गडनदी प्रकल्प : विविध मागण्यांसाठी उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरुच
चिपळूण : गडनदी प्रकल्पग्रस्तांनी आपल्या विविध २० मागण्यांसाठी चिपळूण लघुपाटबंधारे खात्यासमोर सोमवारपासून उपोषण सुरु केले होते. मंगळवारी सायंकाळी उशिरा अधीक्षक अभियंता अ. का. काळोखे यांनी उपोषणकर्त्यांची चिपळूण येथे भेट घेतली.
मौजे राजीवली, कुटगिरी, रातांबी धरणग्रस्त ग्रामस्थ समितीतर्फे सोमवारपासून लघुपाटबंधारे कार्यालयासमोर उपोषण सुरु करण्यात आले आहे. या प्रकल्पग्रस्तांच्या रस्ता, अपुऱ्या सुविधा, शिल्लक कामे, भूखंडाचे सातबारा अदा करण्याबाबतची कामे, नवीन पाईपलाईन, गंजलेले विजेचे पोल, निकृष्ठ शौचालय, स्मशानभूमी व शाळा यासह आश्वासन दिलेली अन्य कामांची पूर्तता करण्यात आलेली नाही. ही पूर्तता तातडीने करावी, या मागणीसाठी हे उपोषण सुरु आहे.
कार्यकारी अभियंता अनिल भालेराव यांनी उपोषणकर्त्यांना समजावून सांगितले. परंतु, उपोषकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत.
प्रकल्पग्रस्तांनी सूचविलेल्या कामांसाठी किमान ३२ कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी लागणार आहे. शासन स्तरावर एवढा निधी उपलब्ध झाल्यानंतर ही सर्व कामे मार्गी लागतील, असे समजते. दरम्यान, सायंकाळी अधीक्षक अभियंता काळोखे यांनी घटनास्थळी भेट देऊन अधिकाऱ्यांशी चर्चा सुरु केली होती. रात्री उशिरापर्यंत उपोषणकर्त्यांचे नेते सूर्यकांत साळुंखे यांच्यासह प्रकल्पग्रस्तांशी ही चर्चा सुरु होती. मात्र तोडगा निघाला नव्हता. (प्रतिनिधी)
४विविध २० मागण्या प्रलंबित.
४प्रकल्पग्रस्तांच्या कामांसाठी ३२ कोटींपेक्षा जास्त निधी लागणार.
४अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू.
४रात्री उशिरापर्यंत तोडगा काढण्यात अपयश.