बारसू, जैतापूरसारखे प्रकल्प सरकारी कागदावरूनही पुसेन; उद्धव ठाकरेंनी दिलं आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 12:09 PM2024-04-29T12:09:39+5:302024-04-29T12:11:48+5:30
'विनाशकारी प्रकल्प कोकणात येणार नाहीतच'
रत्नागिरी : प्रकल्पाला विरोध करणाऱ्या कोकणातील महिलांना या सरकारने मारहाण केली. त्याआधी जैतापूरमध्ये गोळीबारही झाला आहे. मात्र, आम्ही बारसू, जैतापूरसारखे प्रकल्प होऊ देणार नाही. असे विनाशकारी प्रकल्प कोकणात येणार नाहीतच; पण ते सरकारी कागदावरूनही पुसून टाकू, असे आश्वासन उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीतील जाहीर सभेत दिले. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांसारख्या यंत्रणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरगडी झाल्या आहेत, अशी टीका करत त्यांनी भाजपला लक्ष्य केले.
महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपलाच प्रमुख लक्ष्य केले. प्रत्येक सभेत राम राम म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे लोकांचा निरोप घेत आहेत, असा टोलाही त्यांनी हाणला.
कोकण हे शिवसेनेचे हृदय आहे; पण येथून धनुष्यबाण गायब केला गेला; पण खोक्यात बसलेल्या लोकांना कळलेच नाही की गद्दारांचे बाप शिवसेनेचे कोकणाशी असलेले नाते तोडण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप त्यांनी केला. सध्या आयपीएलचे दिवस सुरू आहेत. इकडचा खेळाडू तिकडे आणि तिकडचा खेळाडू इकडे. तशीच अवस्था आता राजकारणाची झाली आहे. त्यामुळे २०१४ आणि २०१९ मध्ये नरेंद्र मोदी यांच्याकडे जो आत्मविश्वास होता, तो आता दिसत नाही. आता ५६ इंचांच्या छातीमधील हवा गेली आहे, असा टोला त्यांनी हाणला.
कांदा निर्यातीवरील बंदीबाबत बोलताना त्यांनी आता भाजपवरील निर्यातबंदी उठवून त्यांनाच बाहेर पाठवण्याची वेळ आली असल्याचे सांगितले आणि ‘अब की बार भाजप तडीपार’ असा नारा दिला. विनायक राऊत यांनी काजू निर्यातबंदीची समस्या मांडली. याचा उल्लेख करून ठाकरे म्हणाले, कोकणातील अशा प्रश्नांकडे भाजपने कधीही लक्ष दिलेले नाही; कारण त्यांचा काेकणावर आकस आहे. आपण मुख्यमंत्री असताना कोरोना आणि दोन वादळे आली. या समस्या आल्या नसत्या तर आंबा, काजूबाबतच्या समस्याही आपण सोडवल्या असत्या.
यावेळी व्यासपीठावर विनायक राऊत, मिलिंद नार्वेकर, आमदार भास्कर जाधव, आमदार राजन साळवी, आमदार वैभव नाईक यांच्यासह उद्धवसेना, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस, तसेच ‘आप’चे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार साळवी, ‘आप’चे जिल्हाध्यक्ष परेश साळवी, राष्ट्रवादीचे सुरेश बने, उद्धवसेनेच्या जान्हवी सावंत, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बशीर मुर्तूझा, काँग्रेसचे अविनाश लाड, आमदार भास्कर जाधव आणि विनायक राऊत यांचीही भाषणे झाली.
डॉ. आंबेडकर महाराष्ट्राचे म्हणून राज्यघटना बदलत आहेत
भाजपचा महाराष्ट्रावर एवढा आकस आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत, म्हणून राज्यघटना बदलण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, असा दावाही उद्धव ठाकरे यांनी केला.