कोजन प्लांटचे काम बंद ठेवण्याचे आश्वासन
By Admin | Published: January 29, 2016 09:51 PM2016-01-29T21:51:46+5:302016-01-30T00:17:49+5:30
ग्रामस्थांची माहिती : लोटे ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश
आवाशी : विनती कंपनीच्या कोजन प्लांटच्या विरोधात लोटे ग्रामस्थांच्यावतीने छेडण्यात आलेल्या आंदोलनाला यश आले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल प्राप्त होईपर्यंत काम बंद ठेवण्याचे लेखी आश्वासन कंपनीच्यावतीने देण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.लोटे औद्योगिक वसाहतीतील विनती आॅर्गेनिक (इं.) लि. ही कंपनी दगडी कोळशापासून वीजनिर्मिती करणाऱ्या युनिटचे काम सुरु करत आहे. काही दिवसांपूर्वी या कामाचे खोदाईकाम सुरु झाल्याचे वृत्त कळताच पुढील धोका लक्षात घेत काही जागरुक नागरिकांनी कंपनीला हे काम थांबवा, अशी विनवणी केली. मात्र, त्यांना न जुमानता कंपनीने काम सुरुच ठेवले. या कामाच्या सर्व परवानग्या घेतलेल्या नसतानाही ग्रामस्थांच्या विनंतीचा अवमान करत कंपनीने काम सुरुच ठेवले. याचा निषेध करण्यासाठी प्रजासत्ताक दिनाला लोटे ग्रामस्थांनी या कंपनीसमोर धरणे आंदोलन छेडले. या आंदोलनांतन खेडचे पोलीस निरीक्षक अशोक जांभळे, प्रदूषण महामंडळाचे अधिकारी, कंपनी व्यवस्थापन यांनी बैठक घेण्याचे आश्वासन देत हे आंदोलन थांबवले. त्यानुसार ही बैठक आयोजित केली होती. या बैठकीला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, चिपळूणचे प्रभारी उपविभागीय अधिकारी मोरे, लोटे पोलीस दूरक्षेत्राचे काकडे, मनसेचे वैभव खेडेकर, नाना चाळके, माजी सरपंच चंद्रकांत चाळके, सुरेंद्र चाळके, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वैभव आंब्रे, संजय चाळके, सुरेश चाळके, संतोष आंब्रे, कंपनीचे संचालक महादेव महिमान, वरिष्ठ व्यवस्थापक जांभेकर, जनसंपर्क अधिकारी सचिन खरे व पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)
अहवालाची प्रतीक्षा : मंडळाकडून पत्र
प्रदूषण नियंत्रण मंडळ व पोलीस यांच्या मध्यस्थीने व ग्रामस्थांच्या भावनांचा विचार करुन पाच मेगावॅट क्षमतेचा उभारल्या जाणाऱ्या वीजनिर्मिती प्रकल्पाचे काम थांबवत आहोत. अहवाल येईपर्यंत हे काम बंद राहणार आहे.
- राजीव जांभेकर,
एजीएम, विनती आॅर्गेनिक
विनती कंपनीला दि. २३ रोजी पत्र देण्यात आले आहे. यामध्ये ८.७२ इतक्या मेगावॅट निर्मितीला स्थगिती देण्यात आली आहे. पाच मेगावॅट निर्मितीचे काम धोकादायक वाटत असल्याने बंद करत असल्याचे पत्र दिले आहे.
- एस. बी. मोरे
प्रदूषण नियंत्रण मंडळ.