योग्य नियोजनाची आवश्यकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:25 AM2021-05-03T04:25:37+5:302021-05-03T04:25:37+5:30
आरोग्य शिबीर देवरूख : शाळकरी मुलांना आरोग्याची काळजी घेण्याबाबत माहिती प्राप्त व्हावी, यासाठी आर. बी. वेल्हाळ इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. कंपनीने ...
आरोग्य शिबीर
देवरूख : शाळकरी मुलांना आरोग्याची काळजी घेण्याबाबत माहिती प्राप्त व्हावी, यासाठी आर. बी. वेल्हाळ इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. कंपनीने निवे आश्रमशाळा, तुळसणी हायस्कूल येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कंपनीचे संस्थापक आर. बी. वेल्हाळ यांनी सामाजिक भावनेतून आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते.
अर्जासाठी आवाहन
दापोली : कोकणातील फलोद्यान पिकातील संशोधन किंवा विस्तार कार्यामध्ये भरीव कार्य करणाऱ्या व्यक्तीला रमाकांत मुकुंद कुबल ऊर्फ आबासाहेब कुबल फलोद्यान पारितोषिक दरवर्षी देण्यात येते. या पारितोषिकासाठी कोकणातील पात्र व्यक्ती व संस्थांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
मान्सून वेळेवर
रत्नागिरी : भारतात सलग तिसऱ्या वर्षी मान्सून जोरदार बरसण्याचा अंदाज असून त्याचे आगमन केरळमध्ये वेळेवरच होणार आहे. प्रतिवर्षाप्रमाणे १ जून रोजी त्याचे केरळमध्ये आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात .७ किंवा ८ जून रोजी मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.
शून्य सावली दिन
रत्नागिरी : राज्यातील सर्व शहरांना शून्य सावली दिवसाचा अनुभव घेता येणार आहे. राज्यात येत्या ३ मे पासून ३१ मे पर्यंत अनेक ठिकाणी शून्य सावली दिन अनुभवता येणार आहे. रत्नागिरीत ७ मे रोजी १२.३३ वाजता आणि ५ ऑगस्ट रोजी १२.४३ वाजता शून्य सावली अनुभवता येणार आहे.
दोन महिने पगाराशिवाय
रत्नागिरी : मे सुरू झाला तरी मार्च महिन्यातील अंगणवाडीसेविकांचे मानधन प्राप्त झालेले नाही. कोरोनामुळे सर्वत्र लाॅकडाऊन असल्याने घरातील अन्य सदस्यांचे उत्पन्न थांबले असून अंगणवाडीसेविकांना दोन महिने मानधनासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.
रस्त्याचे काम रखडले
चिपळूण : विजापूर- गुहागर राष्ट्रीय महामार्गाचे काम मार्गताम्हाणे, उमरोली येथे सुरू असून ते मंदगतीने सुरू आहे. मार्गताम्हाणे-सुतारवाडी पूल येथेही गेले दोन महिने काम चालू आहे. नदीपात्रातून रस्ता काढल्याने नदीचा प्रवाह बदलण्याचा धोका निर्माण झाला आहे. मातीचा रस्ता असून पावसात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.
वेळापत्रक कोलमडले
देवरूख : ऐन गर्दीच्या हंगामात देवरूख एस.टी.आगाराचे वेळापत्रक पुन्हा कोल्ल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने बहुतांशी भागातील लांब पल्ल्याच्या एस. टी. फेऱ्या अनिश्चित कालावधीसाठी बंद करण्यात आल्या आहेत.
उपोषणे स्थगित
दापोली : महाराष्ट्र दिनानिमित्त दापोलीत नियोजित करण्यात आलेली तीन उपाेषणे उपोषणकर्त्यांनी स्थगित केली आहे. रास्त दर धान्य दुकान, परिवहन मंडळ, बांधकाम विभागाविरोधात तीन वेगवेगळ्या उपोषणकर्त्यांनी उपोषणास बसण्याचा निर्धार केला होता. मात्र, संबंधित खात्याकडून मध्यस्ती झाल्यानंतर उपोषण स्थगित केले आहे.
काजूचे दर कोसळलेे
रत्नागिरी : यावर्षीही लाॅकडाऊनचा फटका काजू पिकाला बसला असून काजूचे दर कोसळले आहेत. ७० ते ११० रुपये किलो दराने काजू विक्री सुरू आहे. काजू उत्पादनही हवामानातील बदलामुळे धोक्यात आले असून पीक वाचविण्यासाठी प्रचंड खर्च करावा लागत आहे. उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ बसत नाही. त्यामुळे काजूला हमीभाव जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.