कोकणसाठी स्वतंत्र एक्स्प्रेस वेचा प्रस्ताव : सुनील तटकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 05:04 PM2020-10-13T17:04:27+5:302020-10-13T17:06:57+5:30
sunil tatkare, Ratnagiri, highway कोकणात पनवेल ते सावंतवाडी दरम्यान राष्ट्रीय महामार्ग व सागरी महामार्ग असताना आणखी स्वतंत्र ह्यएक्स्प्रेस वेह्ण उभारला जाणार आहे. त्याला राज्य सरकारने तत्त्वत: मान्यता दिली असल्याची माहिती खासदार सुनील तटकरे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
चिपळूण : कोकणात पनवेल ते सावंतवाडी दरम्यान राष्ट्रीय महामार्ग व सागरी महामार्ग असताना आणखी स्वतंत्र ह्यएक्स्प्रेस वेह्ण उभारला जाणार आहे. त्याला राज्य सरकारने तत्त्वत: मान्यता दिली असल्याची माहिती खासदार सुनील तटकरे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
चिपळूण दौऱ्यावर आलेल्या तटकरे यांनी मंगळवारी येथील पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर ते बोलत होते.
ते म्हणाले की, मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरण व सागरी महामार्गाचे काम पूर्ण केले जाणारच आहे. त्याव्यतिरिक्त स्वतंत्र एक्स्प्रेस वेचा प्रस्ताव राज्य सरकारने तयार केला असून, ही माहिती आपण जबाबदारीने देत आहे. कारण या प्रस्तावाला सरकारने तत्त्वत: मान्यता दिली असून, त्याचा पाठपुरावा मंत्रिमंडळाची पायाभूत समिती घेत आहे. या समितीत मुख्यमंत्री प्रमुख म्हणून काम करतात. शिवाय उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री यांचा समावेश आहे. त्यामुळे या लवकरच वेग येणार आहे, असे सांगितले.
तसेच कृषी विधेयक व कामगार विधेयकावर जोरदार ताशेरे ओढले. कृषी विधेयक पारित झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. एखाद्या वेळी शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर न मिळाल्यास ते या नवीन विधेयकाअंतर्गत कोणाकडेही तक्रार करु शकत नाही. तरीही मोदी सरकार क्रांतिकारक निर्णय घेतल्याचे भासवत आहे.
कामगार विधेयकही कामगारांना देशोधडीला लावणारा आहे. आता ३००पर्यंत कामगार क्षमता असलेला कारखाना क्षणात बंद करण्याचा अधिकार दिला आहे. या विधेयकांच्या माध्यमातून भांडवलदारांनी भांडवलदारांची पाठराखण केली असल्याचा आरोप तटकरे यांनी केला.