रत्नागिरी : पोस्को अंतर्गत प्राचार्याला तीन वर्षे कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 06:20 PM2018-12-11T18:20:13+5:302018-12-11T18:21:17+5:30
प्राचार्य म्हणून काम करणाऱ्या पुरकान इस्माईल कुमठे यांना पोस्को अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यात तीन वर्ष साधा कारावास व विविध कलमांतर्गत १८ हजार पाचशे रुपये दंड अशी शिक्षा येथील जिल्हा अतिरिक्त व सत्र न्यायाधीश ए. एस. आवटे यांनी मंगळवारी सुनावली.
खेड : चिपळूण तालुक्यातील मुरादपुर येथील ए. ई. कालसेकर जुनियर कॉलेजमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असलेला व आता सोलापूर येथे नामांकित महाविद्यालयात प्राचार्य म्हणून काम करणाऱ्या पुरकान इस्माईल कुमठे यांना पोस्को अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यात तीन वर्ष साधा कारावास व विविध कलमांतर्गत १८ हजार पाचशे रुपये दंड अशी शिक्षा येथील जिल्हा अतिरिक्त व सत्र न्यायाधीश ए. एस. आवटे यांनी मंगळवारी सुनावली.
ही घटना २२ आॅक्टोबर २०१३ रोजी संशयित आरोपी कुमठे याच्या घरी दुपारी ३ च्या सुमारास घडली होती. तक्रारदार पीडित विद्यार्थिनी १२वीमध्ये शिकत होती. या विद्यार्थिनीला प्रकल्प करून देण्याच्या निमित्ताने कवठे याने आपल्या घरी बोलाऊन तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले होते.
पीडित तरुणीने धाडसाने स्वत:ची सुटका करून घेतली व घरी परतली. मात्र दुसऱ्या दिवशी या शिक्षकाने दुसऱ्या मुलाजवळ निरोप देऊन तिला बोलावले. पीडित तरुणी २४ आॅक्टोबर १३ रोजी या घटनेचा जाब विचारण्यासाठी कुमठे यांच्या निवासस्थानी सुरू असलेल्या शिकवणी वर्गाच्या दारात गेली.
यावेळी पुरकान कुमठे याने पीडितेला शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली होती. यासंदर्भात पीडित तरुणीने चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या खटल्यात सरकार पक्षातर्फे आठ साक्षीदार तपासण्यात आले तर संशयित आरोपीच्या वकिलांनी दोन बचावाचे साक्षीदार सादर केले. मात्र सरकार पक्षाच्या उलट तपासणीत हे साक्षीदार टिकू शकले नाहीत. सरकार पक्षातर्फे या खटल्याचे काम सरकारी विधीतज्ज्ञ मेघना बारटक्के यांनी पाहिले.