परशुराम घाटातील नैसर्गिक जलस्रोतला दिले संरक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:25 AM2021-05-03T04:25:32+5:302021-05-03T04:25:32+5:30
चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात वाहून जाणाऱ्या नैसर्गिक जलस्रोताला ठेकेदार कंपनीच्या माध्यमातून संरक्षण देण्यात आले आहे. वाया जाणारे ...
चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात वाहून जाणाऱ्या नैसर्गिक जलस्रोताला ठेकेदार कंपनीच्या माध्यमातून संरक्षण देण्यात आले आहे. वाया जाणारे पाणी साठवता येईल व डोंगर उतारावरील वृक्ष लागवडीसाठी उपयोगी पडेल, अशी व्यवस्था येथे उभारण्यात आली आहे. याच पद्धतीने चौपदरीकरणाच्या कामात ज्या-ज्या ठिकाणी नैसर्गिक जलस्रोत उपलब्ध होतील, तेथे संरक्षण देण्याची मागणी निसर्गप्रेमींनी केली आहे.
गेले अनेक दिवस येथील निसर्गप्रेमी परशुराम घाटातील नैसर्गिक जलस्रोतविषयी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे पाठपुरावा करीत होते. मात्र, परशुराम येथील काम जागेच्या मोबदल्यामुळे वादग्रस्त बनले आहे, शिवाय महाड ठेकेदाराच्या हद्दीत हे काम येते. त्यामुळे या कामात अडथळा निर्माण झाला होता. अखेर तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांनी या प्रश्नी सुवर्णमध्य काढला. अधिकारी पाठवून प्रत्यक्ष पाहणी केली व अखेर नायब तहसीलदार तानाजी शेलार व कार्यालयीन अधिकारी प्रसन्ना पेठे यांनी ठेकेदार कंपनी कल्याण टोलवेजचे व्यवस्थापक श्रीकांत बाखळे यांच्या सहकार्याने व त्यांचे पर्यवेक्षक महेश नलावडे यांच्या मदतीने हे काम पूर्णत्वास नेले.
परशुराम घाटातील वाया जाणाऱ्या पाण्याचा सदुपयोग व सिंचनाकरिता येथे जेसीबीद्वारे अनेक झऱ्याचे पाणी एकत्र करून खड्डा मारण्यात आला आहे. उर्वरित वाहून जाणारे पाणी येथे असणाऱ्या नाल्याद्वारे ग्रॅव्हिटीने वाड्यांना व झाडांना सोडण्यात आले आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. तापमानही वाढत आहे. प्रत्येक ठिकाणची भूजल पातळी खालावत आहे. याचा प्रत्येकाने विचार करून जेथे जेथे शक्य आहे, तेथे नैसर्गिक जलस्रोताद्वारे जलसिंचन केले पाहिजे, असे आवाहन जलदूत शाहनवाज शाह यांनी केले आहे.