पिंपळवाडी धरणाच्या सांडव्याची संरक्षण भिंत ढासळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 05:26 PM2019-08-01T17:26:39+5:302019-08-01T17:27:47+5:30
खेड : तालुक्यातील पिंपळवाडी (डुबी) धरणाच्या सांडव्याच्या संरक्षण भिंतीचा भाग कोसळला आहे. या धरणाच्या सांडव्याच्या तळातून मोठ्याप्रमाणावर गळती लागल्याने ...
खेड : तालुक्यातील पिंपळवाडी (डुबी) धरणाच्या सांडव्याच्या संरक्षण भिंतीचा भाग कोसळला आहे. या धरणाच्या सांडव्याच्या तळातून मोठ्याप्रमाणावर गळती लागल्याने धरणाच्या पायथ्याशी असणाऱ्या सात गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. धरणाच्या सांडव्याला मोठ्याप्रमाणावर गळती लागलेले पाणी धरणाच्या पायथ्याशी असणाऱ्या खोपी गावातील शेतीमध्ये गेल्याने भातशेती देखील पाण्याखाली गेली आहे. धरणाच्या सांडव्याचा भाग कोसळला तर सात गावांना धोका निर्माण होण्याची भीती आहे.
जलसंपदा विभाग रत्नागिरी अंतर्गत असणारे पिंपळवाडी (डुबी) धरणाच्या सांडव्याची भिंत तीन वर्षांपूर्वी नादुरुस्त झाली आहे. तेव्हापासून ग्रामस्थांनी या सांडव्याच्या भिंतीच्या दुरुस्तीची मागणी केली होती. मात्र, गेल्या आठवड्यापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे नादुरुस्त असलेली सांडव्याची संरक्षण भिंत अर्धी कोसळली असून, या सांडव्याच्या तळातून मोठी गळती लागली आहे. गळती लागलेले पाणी शेतात शिरले असून, अनेकांची भातशेती पाण्याखाली गेली आहे. या धरणाच्या पायथ्याशीच खोपी, शिरगाव, कुळवंडी, बिजघर, कुंभाड, एनवरे, अशी सात गावे असून या सांडव्याची भिंत वाहून गेल्यास या गावांना धोका असल्याने लोक भयभीत झाले आहेत.
पिंपळवाडी (डुबी) धरणाची क्षमता २७ दशलक्ष घनमीटर एवढी असून आता हे धरण ६७ टक्के भरले आहे. आता या धरणात १८.८९५ दशलक्ष घनमीटर एवढा पाणी साथ झाला असून, १६०.१० क्युसेक्स आणि ५ हजार ६५२.४५ क्युसेक्स घनमीटर सेकंद एवढ्या पाण्याचा विसर्ग सध्या सुरु आहे. या धरण क्षेत्रात आतापर्यंत या वर्षी २७५९ मिलीमीटर एवढा पाऊस पडला आहे. धरणाच्या सांडव्याची भिंत अर्धी कोसळल्याने आणि सांडव्याच्या तळाला मोठी गळती लागल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.