सकल मराठा समाजाकडून केंद्र, राज्य सरकारचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:33 AM2021-05-06T04:33:53+5:302021-05-06T04:33:53+5:30
आरवली : सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्याने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. रत्नागिरी सकल मराठा समाजाच्या ...
आरवली : सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्याने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. रत्नागिरी सकल मराठा समाजाच्या वतीने केंद्र व राज्य सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला, तर आरक्षण समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी करून दाखविले अशी उपहासात्मक टीका करीत जितेंद्र चव्हाण यांनी अशोक चव्हाण यांचे अभिनंदन केले.
मराठा आरक्षण न्यायालयात टिकावे, यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून म्हणावे तसे प्रयत्न झाले नसल्याची खंत रूपेश मांजरेकर यांनी व्यक्त केली आहे. बुधवारी आरक्षण रद्द झाल्यावर आघाडी सरकारमधील पक्षांचे नेते तसेच भाजप नेते हे एकमेकांवर टीका करण्याची नौटंकी करीत आहेत. मात्र या घटनेला केंद्र व राज्य ही दोन्ही सरकारे जबाबदार असून, मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यात दोघेही कमी पडले असल्याचे जितेंद्र चव्हाण म्हणाले.
मराठा समाजातील काही नेतेमंडळीनी आपापल्या पक्षाची बाजू सावरण्याचा नादात मराठा समाजाचा विश्वासघात केला असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे.
आपण केंद्र व राज्य सरकारचा जाहीर निषेध करीत असून, सध्या संपूर्ण महाराष्ट्रावर कोरोनाचे भयंकर संकट असल्याने संयम ठेवून ही महामारी कमी होताच योग्य प्रतिक्रिया दिली जाईल, असा सूचक इशारा सकल मराठा समाज रत्नागिरीच्या वतीने जितेंद्र चव्हाण यांनी दिला.
यावेळी सदानंद ब्रीद, रूपेश सावंत, सचिन शिंदे, संदीप सुर्वे, संजय शिंदे, दिलीप सुर्वे, राजेश पवार यांच्यासह मराठा बांधव उपस्थित होते.