प्रलंबित मागण्याबाबत राज्य परिवहन निवृत्त कर्मचाऱ्यांचे रत्नागिरी विभागीय कार्यशाळेसमोर आंदोलन
By मेहरून नाकाडे | Published: January 29, 2024 04:36 PM2024-01-29T16:36:02+5:302024-01-29T16:36:17+5:30
रत्नागिरी : राज्य परिवहन निवृत्त कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न दीर्घकाळापासून प्रलंबित आहेत. याबाबत शासनाकडे पाठपुरावा करूनही महामंडळ व शासनाकडून दखल ...
रत्नागिरी : राज्य परिवहन निवृत्त कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न दीर्घकाळापासून प्रलंबित आहेत. याबाबत शासनाकडे पाठपुरावा करूनही महामंडळ व शासनाकडून दखल घेण्यात येत नाही. कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेतर्फे सोमवार, दि.२९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता आंदोलन करण्यात आले.
सोमवारी (दि.२९ रोजी) आझाद मैदान (मुंबई) येथेही आंदोलन करण्यात आले. शिवाय प्रत्येक विभागीय कार्यालयासमोर संघटनेतर्फे निदर्शने करण्यात आली. त्यानुसार रत्नागिरी येथील राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयासमोर संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आले. गेल्या तीन वर्षांपासून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची अंतिम देयके अद्याप प्रलंबित आहेत, ती तातडीने अदा करण्यात यावीत. थकीत महागाई भत्ता, थकीत घरभाडे भत्ता तातडीने अदा करण्यात यावा. सर्व थकीत देण्यांवर आठ टक्के दराने व्याज देण्यात यावे.
सेवेतून निवृत्त झालेल्या, राजीनामा दिलेल्या व वीस वर्षे सेवा करून बडतर्फ झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना वर्षभर राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व गाड्यांमधून प्रवासासाठी विनाअट मोफत पास देण्यात यावा, पेन्शनमध्ये वाढ करावी, सेवानिवृत्तांच्या मुलांसाठी नोकरीत पाच टक्के आरक्षण देण्यात यावे यासह अनेक मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.
दीर्घकाल दुर्लक्षित केलेल्या मागण्यांकडे शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वयोवृद्ध निवृत्त कर्मचाऱ्यांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे तातडीने या मागण्यांमध्ये लक्ष घालून वयोवृद्ध निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी राज्य परिवहन निवृत्त एसटी कर्मचारी संघटनेच्या रत्नागिरी विभागातर्फे करण्यात आली. यावेळी विभागीय अध्यक्ष शेखर सावंत, विभागीय सचिव पी.एस. जाधव यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. निवृत्त एसटी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.