रत्नागिरीत मराठा समाज एकवटला, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू
By शोभना कांबळे | Published: September 5, 2023 12:08 PM2023-09-05T12:08:22+5:302023-09-05T12:09:23+5:30
जालना येथील लाठीहल्ल्याचा जाहीर निषेध
रत्नागिरी : जालना येथील मराठा समाजातील बांधवांवर झालेल्या लाठीहल्ल्यानंतर राज्यभर त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. राज्यभर या घटनेचा निषेध होत असतानाच रत्नागिरीतील मराठा समाजही एकवटला आहे. सकल मराठा समाजातर्फे मंगळवारी (५ सप्टेंबर) जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर ठिय्या आंदाेलन सुरू करण्यात आले आहे. या आंदाेलनात मराठा समाज माेठ्या संख्येने सहभागी झाला असून, जाेरदार घाेषणांनी परिसर दणाणून गेला आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी समाज बांधवांकडून लढा सुरू आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जालना येथील अंतरवाली सराटी येथे मनाेज जरांगे - पाटील यांनी उपाेषण सुरू केले आहे. लाेकशाही मार्गाने हे आंदाेलन सुरू असतानाच पाेलिसांकडून उपाेषणकर्त्यांवर लाठीहल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटू लागले आहेत. राज्यभर मराठा समाजाकडून आंदाेलन सुरू असतानाच रत्नागिरी जिल्ह्यातही मराठा समाजाकडून आंदाेलन करण्यात येत आहे.
लांजा, राजापूर येथे मराठा समाजाकडून या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. तर साेमवारी चिपळूण येथे मराठा समाजातर्फे निषेध माेर्चा काढण्यात आला. त्यानंतर आज रत्नागिरीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर रत्नागिरीतील मराठा समाज एकवटला आहे. सकल मराठा समाजातर्फे ठिय्या आंदाेलन पुकारण्यात आले असून, या आंदाेलनाला सकाळपासून सुरूवात झाली. आंदाेलनकर्त्यांनी जालना येथील लाठीहल्ल्याचा जाहीर निषेध केला. तसेच दाेषींवर कारवाई करण्याची मागणीही केली.