आंदोलक ताब्यात, बारसूमध्ये सर्वेक्षणाचे काम सुरू
By मनोज मुळ्ये | Published: April 25, 2023 02:16 PM2023-04-25T14:16:57+5:302023-04-25T14:17:49+5:30
ग्रामस्थांनी केलेल्या विरोधामुळे वातावरण खूप तणावपूर्ण झाले होते.
राजापूर : आंदोलकांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर बारसू येथील घटनास्थळावरील वातावरण शांत झाले आणि सर्वेक्षणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी आवश्यक यंत्रणा उभी करण्याचे काम प्रथम हाती घेण्यात आले. हे सर्वेक्षण नेमके किती दिवस चालेल, याची कोणतीच माहिती नसल्याने हा तणाव आणखी काही दिवस राहणार असल्याचे दिसत आहे.
ग्रामस्थांनी केलेल्या विरोधामुळे वातावरण खूप तणावपूर्ण झाले होते. सकाळी ८ वाजल्यापासून पोलिस आणि इतर अधिकार्यांच्या गाड्या ग्रामस्थांनी अडवल्या. त्यामुळे वातावरण चिघळण्याची शक्यता निर्माण झाली होती. पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. त्यांना रत्नागिरी जिल्हा मुख्यालयात नेण्यात आले. बहुतांश लोकांना ताब्यात घेतल्यानंतर दुपारी अत्यंत कमी आंदोलक बारसूच्या माळरानावर होते.
झाडाच्या सावलीचा आधार घेत ते तेथेच बसून आहेत. मात्र वातावरण निवळले असल्याने सर्वेक्षणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठीचे साहित्य घेतलेला कंटेनर सकाळीच पोलिसांच्या ताफ्यातून सर्वेक्षणस्थळी दाखल झाला आहे. बोअरवेलप्रमाणे खोदकाम केले जाणार असल्याने त्यासाठीची यंत्रांची जुळवाजुळव सुरू करण्यात आली आहे. या कामाला नेमके किती दिवस लागणार आहेत, याची माहिती अजून कोणीही दिलेली नाही. मात्र ३१ मेपर्यंत जमावबंदीचा आदेश लागू ठेवण्यात आला आहे.