रेशनिंग दुकानदारांना विमा संरक्षण द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:33 AM2021-05-21T04:33:03+5:302021-05-21T04:33:03+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : तालुक्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी गंभीर परिस्थितीतही ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : तालुक्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी गंभीर परिस्थितीतही रेशनिंग दुकानदार जिवाची पर्वा न करता सेवा बजावत आहेत. ग्राहकांशी त्यांचा कायम संपर्क येत आहे. आतापर्यंत तालुक्यात दोन दुकानदारांनी कोरोनामुळे आपला जीव गमावल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. याचा गांभीर्याने विचार करून रेशनिंग दुकानदारांना विमा संरक्षण मिळावे व लसीकरणात त्यांना व त्यांच्या कुटुंबाला प्राधान्य द्यावे, अशी मागणी चिपळूण तालुका रेशनिंग व केरोसीन चालक - मालक संघटनेने तहसीलदारांकडे केली आहे.
याबाबत संघटनेचे अध्यक्ष शशिकांत दळवी व उपाध्यक्ष रमेश जाधव यांनी गुरुवारी येथील तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत रेशनिंग दुकानदार व त्यांच्या कुटुंबीयांचे लसीकरण होण्याची अतिशय गरज आहे. तालुक्यामध्ये वहाळ नं. २ व कोंडमळा येथील दुकान चालकांचा कोरोनाने बळी गेला आहे. त्यामुळे अन्य दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रेशनिंग दुकानदारांना विमा संरक्षण मिळणेसुद्धा गरजेचे आहे. त्यामुळे शासकीय पातळीवरील कर्मचारी यांना प्राधान्य देऊन लसीकरण व विमा संरक्षण मिळावे, अशी मागणी शशिकांत दळवी यांनी या निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी विभाग प्रमुख प्रकाश पवार, श्रीकांत लाड, आदी उपस्थित होते.
-------------------------------
चिपळूण तालुका रेशनिंग व केरोसीन चालक - मालक संघटनेतर्फे नायब तहसीलदार तानाजी शेजाळ यांना शशिकांत दळवी, प्रकाश पवार, श्रीकांत लाड यांनी निवेदन दिले.