पात्र शिधापत्रिकाधारकांना ऑफलाइन धान्य उपलब्ध करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:29 AM2021-03-21T04:29:44+5:302021-03-21T04:29:44+5:30

अडरे : चिपळूण तालुक्यामध्ये हजारो शिधापत्रिकाधारक त्यांना मिळणाऱ्या हक्काच्या धान्यापासून वंचित आहेत. पॉस मिशनद्वारे सध्या शिधापत्रिकाधारकांना धान्य वाटप केले ...

Provide offline grain to eligible ration card holders | पात्र शिधापत्रिकाधारकांना ऑफलाइन धान्य उपलब्ध करा

पात्र शिधापत्रिकाधारकांना ऑफलाइन धान्य उपलब्ध करा

googlenewsNext

अडरे : चिपळूण तालुक्यामध्ये हजारो शिधापत्रिकाधारक त्यांना मिळणाऱ्या हक्काच्या धान्यापासून वंचित आहेत. पॉस मिशनद्वारे सध्या शिधापत्रिकाधारकांना धान्य वाटप केले जाते. नेटवर्क नसल्यामुळे ही व्यवस्था अनेक वेळा कुचकामी ठरते. त्यामुळे पात्र शिधापत्रिकाधारकांना ऑफलाइन धान्य उपलब्ध करावे, अशी मागणी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष भरत लब्धे यांनी तहसीलदारांकडे केली आहे.

नेटवर्कच्या अडचणीमुळे नागरिकांना नाहक पुन्हा-पुन्हा धान्यासाठी खेपा माराव्या लागतात. काहींचे आधार कार्ड लिंक नसल्यामुळे त्यांच्या नावावरती धान्य उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. अनेक पात्र शिधापत्रिकाधारकांना गेले सहा महिने धान्य मिळत नाही. काहींचे तर काहीही उत्पन्न नसताना ५० हजारांच्या पुढे उत्पन्न दाखविण्यात आले आहे.

याबाबत आलेल्या तक्रारीसंदर्भात काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष भरत लब्धे, प्रदेश सचिव इब्राहीम दलवाई, जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव यांनी चिपळूण तहसील कार्यालयात भेट देऊन नायब तहसीलदार शेजाळ व पुरवठा अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

गेल्या महिन्यात अनेकांचे आधार कार्ड व इतर कागदपत्रे लिंक करण्यासाठी आणून देण्यात आली होती. अजूनपर्यंत त्यांना धान्य मिळत नाही. त्यामुळे या महागाईच्या काळात त्यांना धान्य आणावे लागते. मिळकत नसणाऱ्या कुटुंबीयांना यामुळे खूप त्रास सहन करावा लागतो. आपल्याकडील त्रुटी त्वरित दुरुस्त करून धान्य उपलब्ध करण्यात यावे. केंद्र सरकारच्या धोरणामुळे स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे दर गगनाला भिडले आहेत. ते परवडत नसल्यामुळे आता सर्वांना रॉकेल उपलब्ध करून द्यावे, अशीही मागणी भरत लब्धे यांनी केली.

गोरगरिबांसाठी, आर्थिक परिस्थिती नसलेल्या घटकांसाठी सार्वजनिक धान्य वितरण प्रणाली राबविण्यात येत आहे. या धोरणापासून तालुक्यातील जिल्ह्यातील एकही पात्र शिधापत्रिकाधारक वंचित राहणार नाहीत, याची खबरदारी पुरवठा विभागाने घेतली पाहिजे. आपल्या व्यवस्थेमध्ये असणाऱ्या त्रुटी ताबडतोब दूर करून सर्वसामान्यांचे हाल थांबवावेत, असे प्रदेश सचिव इब्राहिम दलवाई यांनी सांगितले. जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांशी संपर्क साधून चर्चा घडवून आणली. सर्व त्रुटी दूर करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. यावेळी महादेव चव्हाण, नंदकुमार कामत, मैनुद्दीन सय्यद, बशीर बेबल उपस्थित होते.

Web Title: Provide offline grain to eligible ration card holders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.