लोटे प्राथमिक आरोग्य केंद्रातून २५०० लसीचे डोस प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:32 AM2021-05-18T04:32:39+5:302021-05-18T04:32:39+5:30
आवाशी : खेड तालुक्यातील लोटे प्राथमिक आरोग्य केंद्रातून परिसरातील नागरिकांना २५४० लसीचे डोस देण्यात आले असून यामध्ये २२ गावांचा ...
आवाशी : खेड तालुक्यातील लोटे प्राथमिक आरोग्य केंद्रातून परिसरातील नागरिकांना २५४० लसीचे डोस देण्यात आले असून यामध्ये २२ गावांचा समावेश आहे.
वय वर्षे ४५ वरील ज्येष्ठ नागरिकांसह १८ ते ४४ या वयोगटांतील तरुणांनाही येथे कोवॅक्सिन व कोविशिल्डचे डोस देण्यात आले. दररोज या ठिकाणी लस घेण्यासाठी येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीत येणाऱ्या या प्राथमिक आरोग्य केंद्राला लगतची २२ गावे जोडण्यात आलेली आहेत. या प्राथमिक आरोग्य केंद्रात विविध आजारांचे उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. महामार्गालगत असणाऱ्या या प्राथमिक आरोग्य केंद्रात मार्च २०२१ पासून कोरोना विषाणूवरील लसीकरण सुरू करण्यात आले आहे. या केंद्रात कोवॅक्सिन व कोविशिल्ड लसीचे २५४० डोस आजपर्यंत प्रत्येक गावातील नागरिकांना देण्यात आले आहेत. यामध्ये येथील कंपन्यांतून काम करणाऱ्या कामगारांचाही समावेश आहे. एकूण देण्यात आलेल्या लसीकरणांमध्ये १८ ते ४४ या वयाच्या तरुणांचाही समावेश असून ४५ वर्षांपर्यंत ज्येष्ठ नागरिकांच्या दुसऱ्या डोसचाही समावेश आहे.
या केंद्रांअंतर्गत सहा उपकेंद्रे कार्यान्वित असून समाविष्ट असणाऱ्या २२ गावांच्या लोकसंख्येचा विचार करता अजूनही अनेक जणांचे लसीकरण अपूर्ण आहे. लसीच्या पुरवठ्यात सातत्य नसले तरी येथील वैद्यकीय अधिकारी टिप्रेस्वार या येणाऱ्या डोसचे उत्तम प्रकारे नियोजन करत आहेत. त्यांना त्यांच्या केंद्रातील सहकारी कर्मचाऱ्यांचेही उत्तम सहकार्य लाभत आहे. नागरिकांनीही योग्य प्रकारे सहकार्य करण्याचे त्यांनी आवाहन केले आहे.