कोरोना काळात मनोरुग्ण वृद्धेला मिळाले उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:32 AM2021-05-11T04:32:55+5:302021-05-11T04:32:55+5:30
रत्नागिरी : मनोरुग्ण असलेल्या वृद्धेचा दगडांचा मारा थोपवून तिला मनोरुग्णालयात दाखल करून लागलीच तिला उपचार मिळवून देण्याचा ...
रत्नागिरी : मनोरुग्ण असलेल्या वृद्धेचा दगडांचा मारा थोपवून तिला मनोरुग्णालयात दाखल करून लागलीच तिला उपचार मिळवून देण्याचा माणुसकीचा धर्म शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि राजरत्न प्रतिष्ठान या दोन सेवाभावी संस्थांच्या कार्यकर्त्यांनी पाळून समाजासमोर आदर्श ठेवला आहे.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संस्थेचे मावळे रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे मारुती मंदिर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूजनासाठी आले असता, तेथे असलेली एक वृद्ध महिला नागरिकांना दगड मारताना दिसली. काय करावे, हे कुणालाच सुचत नव्हते. महिलेवर मानसिक परिणाम झाल्यासारखी ती वागत होती. शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे जयदीप साळवी यांनी राजरत्न प्रतिष्ठानचे सचिन शिंदे यांना तातडीने मोबाइलवरून माहिती दिली. नेहमीच अशा लोकांसाठी सदैव तत्पर असलेल्या राजरत्न प्रतिष्ठानचे शिलेदार सचिन शिंदे लगेचच त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी त्या महिलेला मायेने शांत केले. तिला स्वच्छ आंघोळ घालून तिला तेवढ्याच मायेने खाऊ घालण्यात आले आणि येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले. ममत्वाने सारे करणारी माणसे भेटल्याने त्या वृद्धेचा सकाळचा कोपिष्ट स्वभाव शांत झाला.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि राजरत्न प्रतिष्ठान या दोन्ही संस्था छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांनी प्रेरित आहेत. कोरोना काळात सुरक्षिततेसाठी नागरिक घरात आहेत; मात्र ही वृद्ध महिला रस्त्यावर भटकत असल्याने तिला असलेला धोका लक्षात घेऊन रस्त्यावर भटकू न देता तिला मनोरुग्णालयात दाखल करून तिला उपचार मिळवून देत मानवता धर्माचे दर्शन घडविले आहे.
खरं तर दगड मारणाऱ्या या वृद्धेचा पवित्रा पाहाताच हे सारेच कार्यकर्ते भांबावले होते; मात्र राजरत्न प्रतिष्ठानचे सचिन शिंदे यांनी मायेने तिला शांत केले. राजरत्न प्रतिष्ठानचे ऐश्वर्या गावकर, जया दावर, तन्मय सावंत, शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे जयदीप साळवी, अमित काटे, तसेच पाेलीस कर्मचारी नीलेश कांबळे, होमगार्ड नाचणकर यांच्या सहायाने स्वच्छ आंधोळ घातली. रत्नागिरीचे हाॅटेल व्यावसायिक मृत्युंजय ऊर्फ लाल्या खातू यांनी त्या महिलेस आंघोळ घालण्यास जागा उपलब्ध करून दिली व नाश्ताही दिला.