औषधासमवेत रुग्णांना दिला जातोय मानसिक आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:32 AM2021-05-21T04:32:19+5:302021-05-21T04:32:19+5:30
पाचल : कोरोना संसर्गाची भीती अनेकांना सतावत आहे़ अशा परिस्थितीत राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील कोविड सेंटरमधील डाॅक्टर, परिचारिका ...
पाचल : कोरोना संसर्गाची भीती अनेकांना सतावत आहे़ अशा परिस्थितीत राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील कोविड सेंटरमधील डाॅक्टर, परिचारिका व इतर कर्मचारी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता जीव धाेक्यात घालून कोरोना रुग्णावर उपचार करीत आहेत. रुग्णावर नुसते उपचार करीत नसून त्यांचे मानसिक संतुलन व मनोबल वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबवून आजाराशी लढण्यासाठी एक नवी उमेद देत आहेत.
रायपाटण-पाचलसारख्या एका ग्रामीण भागात हे कोविड सेंटर कार्यरत आहे. शंभर बेडची व्यवस्था असलेल्या या कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन बेड नाहीत, पाण्याची पुरेशी सोय नाही, वीज गेल्यानंतर जनरेटरची व्यवस्था नाही. अशा अनेक अडचणींवर मात करून उपलब्ध सुविधांमधून रुग्णांना उत्तमोत्तम सेवा देण्याचे काम डाॅक्टर्स व परिचारिका करीत आहेत. कोरोना रुग्णांचे मानसिक मनोबल वाढविण्यासाठी सेंटरमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. योगा, आजारविषयी प्रबोधनात्मक माहिती, त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे खेळ, रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी योग्य व पोषक आहार दिला जातो. येथील रुग्णांवर आजाराचे दडपण न दिसता तेथे मिळणाऱ्या आधारामुळे व कर्मचाऱ्यांच्या चांगल्या वागणुकीमुळे एक वेगळाच आनंद रुग्णांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. त्यामुळे या कोविड सेंटरमध्ये येणारा रुग्ण मानसिक आधारामुळे लवकर बरा होऊन घरी परतत आहे.
या कोरोना आजारात प्रत्येक रुग्णाला मानसिक आजाराची गरज आहे. या आजाराबाबत अनेक गैरसमज पसरविण्यात आल्याने अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. शरीरावर उपचार करताना मन ताजतवानं, प्रफुल्लित ठेवण्यासाठी जे जे शक्य आहे, ते सर्व प्रयत्न येथील डाॅक्टर करीत आहेत. प्रत्येकाची आपुलकीने विचारपूस, प्रत्येकांनी बरे होऊन व इतरांना मदत करण्यासाठी प्रोत्साहित करणारे येथील डाॅक्टर व त्यांचे सर्व सहकारी कार्यरत आहेत. या कोविड सेंटरमध्ये दाखल झालेल्या रुग्णांपैकी आजपर्यंत एकही रुग्ण दगावलेला नाही. ही अतिशय दिलासा देणारी बाब असून, रुग्णांना आजाराशी लढण्यासाठी एक नवी उमेद मिळत आहे.