पु. लं.च्या परिस स्पर्शाने ‘वस्त्रहरण’चे झाले सोने
By admin | Published: May 17, 2016 09:48 PM2016-05-17T21:48:43+5:302016-05-18T00:17:18+5:30
गंगाराम गवाणकर : ‘मुंबई ते लंडन व्हाया वस्त्रहरण’चा प्रवास
जैतापूर : विनोदाचा बादशहा पु. ल. देशपांडे यांच्या परीस स्पर्शाने वस्त्रहरण नाटकाचे सोने झाले आणि ज्या विमानतळावर मजुरीचे काम करीत होतो, त्याच विमानतळावरून आपलं नाटक घेऊन परदेशात जाऊ शकलो. साहित्य किंवा नाट्य याची कोणतीही पार्श्वभूमी नसताना राजापूर तालुक्यातील माडबन या छोट्याशा खेडेगावातील गरीब मुलगा केवळ नाट्यचळवळीतील सेवेमुळे अखिल भारतीय नाट्य संमेलनाचा अध्यक्ष झाला आणि तेही बिनविरोध! असा सारा जीवनप्रवास ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांनी प्रेक्षकांसमोर उलगडून सांगितला.जैतापूर येथील ग्रामदैवत श्री देव वेताळ मंदिर जीर्णोध्दाराच्या व्दितीय वर्धापन दिनानिमित्त अखिल भारतीय नाट्य संमेलनाध्यक्ष वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांचा जीवनप्रवास उलगडणाऱ्या मुंबई ते लंडन व्हाया वस्त्रहरण या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पत्रकार राजन लाड यांनी त्यांची मुलाखत घेतली.
वस्त्रहरणचे लेखन कसे झाले, या नाटकाला यश कसे मिळाले, लंडनचा प्रवास कसा झाला, हे सर्व विनोदीशैलीत सांगत त्यांनी आपल्या जीवनातील अनेक किस्से सांगितले. केवळ नाट्य लेखन नव्हे; तर कविता, पत्रकारिता आदी प्रांतातही गवाणकर यांची मुशाफिरी असते, हे उपस्थितांना जाणून घेता आले. (वार्ताहर)