जनता दरबारात दाखवली चमक

By admin | Published: February 27, 2015 10:49 PM2015-02-27T22:49:37+5:302015-02-27T23:21:13+5:30

रवींद्र वायकर : संघटनेला नवे बळ देण्यासाठी प्रयत्न सुरू

The public courtesy showed the brightness | जनता दरबारात दाखवली चमक

जनता दरबारात दाखवली चमक

Next

सुभाष कदम- चिपळूण -पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी मंत्रीपदाची धुरा सांभाळल्यानंतर सर्वच तालुके पिंजून काढले आहेत. प्रत्येक तालुक्यात जनता दरबाराच्या माध्यमातून सर्व अधिकारी, लोकप्रतिनिधी व सामान्य नागरिक यांना एक व्यासपीठ उपलब्ध करुन दिले. त्यामुळे सर्वपक्षीय नागरिक या जनता दरबारात उपस्थित होते. यामध्ये विविध समस्यांचा पाऊस पडला. प्रत्येक प्रश्नाला उत्तर देताना पालकमंत्री वायकर यांनी आपली राजकीय प्रगल्भता दाखवली.
जिल्ह्यातील विविध तालुक्यात गेले तीन दिवस जनता दरबाराच्या माध्यमातून पालकमंत्री वायकर पोहचले. या जनता दरबाराच्या माध्यमातून एका दगडात त्यांनी दोन पक्षी मारले. एक तर अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्याबरोबर सामान्य जनतेलाही प्रश्न मांडण्याचे व्यासपीठ खुले करुन दिले. त्यामुळे न कचरता अगदी पाखाडीपासून रस्त्यापर्यंत, विहिरीपासून नळपाणी योजनेपर्यंत, महसूलचे विविध प्रश्न, भूमिअभिलेखचे प्रश्न, पाटबंधारे, कृषी, महावितरण, एस. टी. महामंडळ अशा सर्वच खात्यातील प्रश्नांचा पाऊस नागरिकांनी पाडला. प्रत्येकाचे समाधान होईपर्यंत त्या प्रश्नाचा पाठपुरावा पालकमंत्र्यांनी केला. अधिकाऱ्यांनी गोलमाल उत्तरे दिल्यामुळे काहींनी नाराजी व्यक्त केली. परंतु, अधिकाऱ्यांनी काम केले नाही, त्याकडे दुर्लक्ष केले तर पुन्हा १५ दिवस महिन्याने मी येणार आहे. आपण मला सातत्याने भेटणारच आहात त्यावेळेला बघू असा विश्वासही त्यांनी नागरिकांना दिला.
जे आता होणार नाही ते काम पुढील आर्थिक वर्षात केले जाईल, असे स्पष्ट त्यांनी सांगितल्याने सर्वच राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांनीही त्यांचे कौतुक केले.
जनता दरबार भरवून जनतेच्या प्रश्नांना वाट मोकळी करुन देण्याचे औदार्य पालकमंत्र्यांनी दाखवल्याने शेकडो निवेदने त्या त्या तालुक्यातून प्राप्त झाली होती. त्याचे निराकरण करताना कमी अधिक प्रमाणात एखाद्याला न्याय मिळालाही असेल परंतु, या जनता दरबारात चर्चा झाली हेही पुरेसे आहे. सर्वच प्रश्न जादुच्या कांडी फिरवल्याप्रमाणे सुटणार नाहीत, याची जाणीव नागरिकांना व पदाधिकाऱ्यांनाही असते. त्यामुळे प्रयत्न करणे महत्त्वाचे असते. त्यासाठी आपण कुठेही कमी पडणार नाही, असे मंत्री वायकर यांनी ठणकावून सांगितले.
काही कामात अधिकाऱ्यांनी दिरंगाई केली किंवा कसूर केली असेल, कुचराई केली असेल त्यांची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करा, असे आदेशही त्यांनी दिले. तर काम करताना जाणीवपूर्वक एखादी ग्रामपंचायत, एखादा सरपंच किंवा त्याचा नातेवाईक विकासाच्या आड येऊन कोणाला वेठीस धरत असेल, तर त्याची गय करु नका असेही त्यांनी स्पष्टपणे बजावले. पालकमंत्र्यांच्या या जनता दरबाराचा जिल्ह्यात चांगलाच बोलबाला झाला. राजकारणाच्या पलिकडे जाऊन त्यांनी यावर चर्चा घडवून आणली. त्यामुळे पालकमंत्री कोणत्या पक्षाचे आहेत, यापेक्षा त्यांनी आपले कर्तव्य चोख बजावले.
विकासकामात राजकारण नको ही आपली भूमिका स्पष्ट केली व विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना सन्मान दिला. त्यामुळे विरोधी पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारीही समाधानी होते. हा दौरा त्यांच्या भावी वाटचालीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरला आहे. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, त्याप्रमाणे पालकमंत्र्यांचा या दौरा अधिकारी, पदाधिकारी व लोकप्रतिनिधींना खूप काही सांगून गेला आहे. जिल्ह्यासाठी नवा प्रयोग, संघटनेसाठी ताकद देणारा व ठरला आहे.

Web Title: The public courtesy showed the brightness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.