हातखंबा येथे उद्यापासून जनता कर्फ्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:33 AM2021-05-09T04:33:14+5:302021-05-09T04:33:14+5:30
रत्नागिरी : तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा परिसरात १०० पेक्षा जास्त कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीने जनता कर्फ्यूचा ...
रत्नागिरी : तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा परिसरात १०० पेक्षा जास्त कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीने जनता कर्फ्यूचा निर्णय घेतला आहे. १० ते १४ मे या कालावधीत याची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. अत्यावश्यक वैद्यकीय सेवा वगळता अन्य सर्व सेवा बंद ठेवल्या जाणार आहेत. तसेच विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर ५०० रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
हातखंबा परिसरामध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. या परिसरात काही व्यावसायिक सकाळच्या सत्रात दुकाने उघडी ठेवतात. महामार्गावर बाहेरून माल वाहतुकीची वाहने ये-जा करताना या ठिकाणी थांबतात. ती कोरोना स्प्रेडर बनल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे हातखंबा परिसरातील सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची कठोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. गावात विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करतानाच त्यांची कोरोना चाचणीही बंधनकारक केली जाणार आहे.
१५ मे रोजी गावातील कोरोना रुग्णांची संख्या पाहून ग्रामकृती दल दुकाने सुरू करण्याबाबत निर्णय घेणार आहे. बंद कालावधीत दुकाने उघडी आढळल्यास त्यांना ५००० रुपयांचा दंड आकारण्यात येईल. सर्व दुकाने पूर्णवेळ बंद राहणार आहेत. या कालावधीत हॉटेल, किराणा दुकान, जनरल स्टोअर, दूध, भाजी, मासे, मटण, चिकन व हार्डवेअर विक्रेते यांचीही दुकाने बंद राहतील. डॉक्टर व औषधांची दुकाने अत्यावश्यक सुविधा म्हणून कायम सुरू राहतील. गावातील बँका, सेवा केंद्रे आणि महा-ई-सेवा केंद्रे पूर्णपणे बंद राहतील. सर्दी, ताप, खोकला आढळल्यास तत्काळ कळवावे, असे आवाहन ग्रामकृती दलाने केले आहे.