लोकआरोग्य प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:24 AM2021-05-29T04:24:00+5:302021-05-29T04:24:00+5:30

दापोली : चिखलगाव येथील लोकमान्य पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेला इदं न मम फाऊंडेशनतर्फे अत्याधुनिक ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर देणगीस्वरुपात ...

Public Health Project | लोकआरोग्य प्रकल्प

लोकआरोग्य प्रकल्प

Next

दापोली : चिखलगाव येथील लोकमान्य पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेला इदं न मम फाऊंडेशनतर्फे अत्याधुनिक ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर देणगीस्वरुपात देण्यात आला. फाऊंडेशनचे श्रीकांत केळकर आणि शाम वाघ यांनी लोकआरोग्य प्रकल्पांतर्गत हे उपकरण डॉ. अनिरुद्ध डोंगरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडे सुपूर्द केले.

महिलांना १ कोटीचा निधी

रत्नागिरी : उमेद अभियानातील महिला बचत गटांमार्फत अन्न प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग योजनेतील जिल्ह्यातील १३४ महिला लाभार्थ्यांना १ कोटी ३७ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत रत्नागिरी जिल्ह्याला सर्वाधिक निधी मिळाला आहे.

विशेष शिबिराची मागणी

रत्नागिरी : शहरानजीकच्या मिरजोळे गावात अनेक ग्रामस्थ कोरोनाबाधित झाले आहेत. येथील वाढता संसर्ग रोखण्यासाठी ग्रामस्थांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिर ग्रामपंचायतीत घेण्याची मागणी सरपंच संदीप नाचणकर यांनी आरोग्य यंत्रणेकडे केली आहे. याबाबतचे पत्र ग्रामपंचायतीकडून देण्यात आले आहे.

मंदिराचे नुकसान

साखरपा : साखरेची पोती घेऊन जाणाऱ्या मालवाहू ट्रकची धडक येथील गोसावी बाबा मंदिराला बसली. त्यामुळे मंदिराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हा अपघात संगमेश्वर तालुक्यातील देवळे फाटा येथे झाला. या मंदिराच्या नुकसानाचा पंचनामा करण्यात आला आहे.

स्वखर्चाने डांबरीकरण

शिरगाव : चिपळूण तालुक्यातील कोळकेवाडी येथील ग्रामदेवता श्री वाघजाई केदार मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पोफळी पंचायत समितीचे सदस्य बाबू साळवी यांनी स्वखर्चाने करुन दिले आहे. बरीच वर्षे हा मुख्य रस्ता नादुरुस्त होता. मात्र, आता डांबरीकरण झाल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.

जीवनावश्यक वस्तू वाटप

राजापूर : तालुक्यातील खिणगिणी ग्रामपंचायतीचे सदस्य आणि रत्नागिरी जिल्हा युवक संस्थेचे अध्यक्ष वैभव कोकरे यांनी निराधार आणि गरजू व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप स्वखर्चाने केले. यापूर्वीही त्यांनी विविध कार्यक्रमांमधून गरजूंना रोख रक्कम तसेच आवश्यक साहित्याचे वाटप केले आहे.

चक्रीवादळाचा प्रभाव

रत्नागिरी : बंगालच्या उपसागरात यास चक्रीवादळ अधिक तीव्र होत असून, या वादळामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्गसह कोकण आणि अन्य जिल्ह्यांना फटका बसणार असण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. पुढच्या दोन दिवसात काही भागांमधून पावसाच्या हलक्या सरी तर काही ठिकाणी सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.

सकस आहाराचे वाटप

खेड : कोरोनाबाधित रुग्णांना सकस आणि पोषक आहार मिळावा, यासाठी येथील भाजपकडून पोषक आहार वाटप उपक्रम राबवला जात आहे. खेड नगर परिषद कोविड सेंटर, कळंबणी कोविड सेंटर येथील रुग्णांना शाकाहारी जेवण, सूप तसेच अन्य सकस आणि पौष्टिक आहार पुरविण्यात येत आहे.

आरोपांच्या फैरी

रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक पावसाळ्यानंतर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या अनुषंगाने सध्या विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेचे अस्त्र उगारण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर विकासकामांची जंत्री देत सत्ताधाऱ्यांनीही विरोधकांना टीकेचे केंद्र बनविण्यास सुरुवात केली आहे.

कर्मचाऱ्यांना लसीकरण

दापोली : येथील आगारात ३९३ कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी १९७ कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले असून, उर्वरित १९६ जणांचे लसीकरण बाकी आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना आगारातच टप्प्याटप्प्याने लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी आगारातील या कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

Web Title: Public Health Project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.