प्रकल्पाबाबत जनसुनावणीची मागणी
By Admin | Published: December 23, 2014 11:31 PM2014-12-23T23:31:39+5:302014-12-23T23:41:07+5:30
जामदा धरण : धर्मराज्य शेतकरी संघटनेने दिले निवेदन...
रत्नागिरी : जामदा पाटबंधारे प्रकल्पामध्ये प्रकल्पग्रस्तांची फसवणूक करण्यात आली असून, याप्रकरणी पुन्हा जनसुनावणी घ्यावी, अशी मागणी धर्मराज्य शेतकरी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात पुनर्वसन आराखड्यासह पुनर्वसन, भूसंपादन तसेच विहिरी, घरांची मोजणीही अयोग्य असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.
जामदा पाटबंधारे प्रकल्प राबवताना बुडीत क्षेत्रातील काजिर्डा आणि राणेवाडी गावातील ग्रामस्थांना विश्वासात घेण्यात आले नाही. या ठिकाणी वर्षाचे ३६५ दिवस मुबलक पाणी असताना तेथे धरणाची गरजच नसल्याचे धर्मराज्य शेतकरी संघटनेचे मत आहे.
भूसंपादन करताना कलम ४ ते ११नुसार सर्व कलमांची कार्यवाही करणे गरजेचे होते. मात्र, आजवर करण्यात आलेल्या घरे, विहिरी, शेतजमिनी व वनजमिनी यांची मोजणीही व्यवस्थित झालेली नाही. काजिर्डा राणेवाडीतील झाडांचीही योग्य मोजणी झाली नाही. रस्ते, घरे, शाळा व इतर सुविधांसाठी घ्यावयाचे एकूण भूखंड क्षेत्र निश्चित करण्यात आलेले नाही, असा आरोप या शेतकरी संघटनेने केला आहे.
हा प्रकल्प मुद्दामहून रेगाळत ठेवण्यात आला आहे. त्यामुळे प्रकल्पावरील खर्च दहापटीपेक्षा अधिक वाढला आहे. या एकूणच प्रकल्पामध्ये अतोनात पैसा ठेकेदाराच्या घशात घालण्यात आल्याचा आरोपही संघटनेने दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे.
प्रकल्पग्रस्तांना देयक क्षेत्र जमीन, पर्यायासाठी लागणारी शेतजमीन योग्य पद्धतीने देण्यात आली नसल्याचा आरोपही संघटनेच्या निवेदनात करण्यात आला आहे. ग्रामस्थांनी याबाबत वेळोवेळी हरकतीही घेतल्या आहेत. मात्र, त्याची दखल प्रशासनाने घेतलेली नाही. असा आरोप संघटनेने केला असून, हा प्रकल्प रद्द करावा तसेच काजिर्डा - राणेवाडी येथील ग्रामस्थांची जनसुनावणी घेण्याबाबत येत्या १५ दिवसांत बैठक बोलवावी, अशी मागणीही संघटनेने केली आहे. (प्रतिनिधी)