नगराध्यक्षांना जनताच जागा दाखवेल
By admin | Published: May 14, 2016 11:47 PM2016-05-14T23:47:19+5:302016-05-14T23:47:19+5:30
शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोद शेरे
रत्नागिरी : रत्नागिरीची जनता ही बॉस आहे. नगराध्यक्षांचा तोल सुटलेला आहे. येत्या निवडणुकीत जनताच त्यांना जागा दाखवेल, असा टोला बॉस म्हणणाऱ्या नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांना शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोद शेरे यांनी पत्रकार परिषदेत हाणला.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश सावंत, शहरप्रमुख प्रमोद शेरे, उपनगराध्यक्ष भय्या मलुष्टे, राहुल पंडित, आदी पदाधिकाऱ्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत आमदार सामंत यांची बाजू स्पष्ट केली. आमदारांनी घेतलेली नगर परिषदेची बैठक ही सर्वपक्षीय नगरसेवकांच्या समन्वयासाठी होती. कोणावरही बॉसिंग करण्यासाठी नव्हे, असे शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश सावंत यांनी सांगितले. रत्नागिरी नगर परिषदेला शासनाकडून प्राप्त झालेला निधी व विकासकामांचा आढावा आमदार उदय सामंत यांनी मुख्याधिकारी व प्रशासनातील संबंधित प्रमुखांच्या उपस्थितीत ११ मे रोजी घेतला होता. यावेळी नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनाही उपस्थित राहण्याची विनंती केली होती. परंतु, ते अनुपस्थित राहिले. दुसऱ्या दिवशी नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार सामंत यांच्यावर जोरदार शरसंधान साधले. त्यांनी सांगितले की, शहरासाठी प्रस्तावित असलेल्या ६८ कोटींच्या सुधारीत योजनेसाठी आमदार सामंत यांनी प्रधान सचिवांकडे अंतिम मंजुरीसाठी पाऊल उचलल्याचे सांगितले आहे. मात्र, मंजुरीचे काम अंतिम टप्प्यात असल्याने आमदारांचे हे वक्तव्य बालिशपणाचे असल्याचेही मयेकर यांनी म्हटले होते. आमदार सामंत यांनी सवंग प्रसिद्धीसाठी आयत्यावर कोयता मारून श्रेयवाद लाटण्याचा प्रयत्न चालवला असल्याचा आरोप करत नगर परिषदेचा मी बॉस आहे, आमदार नव्हे असा टोला हाणला होता.
यावर बोलताना राजेश सावंत यांनी सांगितले की, रत्नागिरी नगर परिषद ही रत्नागिरी विधानसभा मतदार संघात येते. सद्यस्थितीत नगर परिषदेवर शिवसेना -भाजप युतीची सत्ता आहे. शहरातील विकासकामांसाठी नगर परिषदेला दिलेला निधी खर्ची पडला का? याचा आढावा घेण्यासाठी आमदार सामंत यांनी ही बैठक घेतली होती. शहरातील नागरिकांनी नगर परिषद निवडणुकीत युतीच्या उमेदवारांना, लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत तसेच आमदार उदय सामंत यांना निवडून दिले. त्यामुळे भविष्यात नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीदरम्यान हीच जनता शहरातील विकासकामांबाबत युतीला जाब विचारू शकते. त्यामुळे समन्वयाच्या भूमिकेतूनच आमदार सामंत यांनी या बैठकीचे आयोजन केले होते.
या बैठकीत ६८ कोटी रुपयांच्या विस्तारीत नळपाणी योजनेचा आढावा घेण्यात आला. वास्तविक या योजनेचे नियोजन सेनेचे तत्कालीन नगराध्यक्ष मिलिंद कीर यांच्या कारकिर्दीत झाले. ही योजना सेना - भाजप युतीच्या कारकिर्दीत मार्गी लागत असल्याने याचे श्रेय कोणा एका पक्षाकडे न जाता ते युतीकडे जाणार आहे. त्यामुळे श्रेयवादासाठी शिवसेना आटापीटा करत आहे, हा नगराध्यक्षांचा आरोप शिवसेना शहरप्रमुख प्रमोद शेरे यांनी फेटाळून लावला.
यावेळी नगरसेवक राहुल पंडित म्हणाले की, शहरासाठी पाणीप्रश्न पर्यायानेच ६८ कोटींची विस्तारीत नळपाणी योजना महत्वाची आहे. एकीकडे नगर परिषद क्षेत्राबाहेर असलेल्या एका गृहसंकुलाला शहरातील पाणी देण्यात आले. त्यामुळे शहरवासीयांच्या तोंडचे पाणी पळवून ते शहराबाहेर नेणे कितपत योग्य आहे. यावरून झारीतले शुक्राचार्य कोण आहेत? हे सर्वांनाच माहिती आहे, असे पंडित यांनी म्हटले आहे. (शहर वार्ताहर)
बैठक होणारच
सुधारीत पाणी योजनेबाबत येत्या १८ मे रोजी नगर परिषद सभागृहात माहितीपर बैठक होणार असल्याचे आमदार सामंत यांनी सांगितले होते. परंतु, ही बैठक होणार नाही, असे नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी सांगितले. मात्र, रत्नागिरी नगर परिषद आमदार उदय सामंत यांच्याबरोबर खासदार विनायक राऊत यांच्या मतदारसंघात येत असल्याने १९ मे रोजीची बैठक कोणत्याही परिस्थितीत होणारच, असे सांगितले.