लांजातील रस्ते कामांबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग बेजबाबदार : दत्ताजी कदम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:31 AM2021-03-26T04:31:49+5:302021-03-26T04:31:49+5:30
वाटूळ : लांजा तालुक्यातील रस्त्याच्या कामाबाबत होणारी दिरंगाई आणि बेजबाबदारपणा याबाबतीत सातत्याने तक्रार करुनही सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत ...
वाटूळ : लांजा तालुक्यातील रस्त्याच्या कामाबाबत होणारी दिरंगाई आणि बेजबाबदारपणा याबाबतीत सातत्याने तक्रार करुनही सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याने माजी बांधकाम सभापती दत्ताजी कदम यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
लांजा तालुक्यातील दळणवळण, रहदारीसाठीचे प्रमुख रस्ते नादुरुस्त असून, त्यांची मागील चार-पाच वर्षांपासून अतिशय दुरवस्था झाली आहे. याबाबत अनेकदा सार्वजनिक बांधकाम उपविभाग लांजा, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, उत्तर रत्नागिरी यांच्या निदर्शनाला आणून दिलेले आहे. सातत्याने लेखी तक्रार अर्जही दाखल केले आहेत.
दाभोळे-शिपोशी, कोर्ले-वाटूळ रस्ता नूतनीकरण व विस्तारीकरण करण्याचे काम फेब्रुवारी २०२०पासून सुरु करण्यात आले होते. ही काम अतिशय संथगतीने होत असून, त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. संबंधित रस्त्यावरील मोऱ्या दुरुस्तीच्या कामामुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे.
रस्त्याच्या दुरुस्तीबाबत सातत्याने होणाऱ्या हलगर्जीपणामुळे मागील पावसाळ्यापूर्वी याबाबत कळवूनही दखल घेतली नसल्याने या रस्त्यांवरील वाहतूक धोकादायक व गैरसोयीची झाली आहे.
यावर्षीच्या पावसाळ्यातही अशाचप्रकारे परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत तातडीने कार्यवाही होणे आवश्यक असून, लांजा तालुक्यातील सर्व नादुरुस्त, अर्धवट कामांची पाहणी करुन ३० एप्रिलपर्यंत सुधारणा करावी अन्यथा १ मेपासून जनआंदोलन उभारले जाईल, असा इशारा दत्ताजी कदम यांनी दिला आहे.