गेट वे आॅफ दाभोळ पुस्तकाचे प्रकाशन
By admin | Published: May 25, 2016 10:06 PM2016-05-25T22:06:34+5:302016-05-25T23:40:25+5:30
विविध ट्रस्टनी केलेल्या मदतीमुळे प्रकाशनाच्या दिवशी हा अमूल्य संदर्भमूल्य असलेला ग्रंथ सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिला गेल्याने या पुस्तकाची पहिली आवृत्ती जवळपास कार्यक्रमस्थळीच संपली.
खेड : नामवंत इतिहास संशोधक अण्णासाहेब शिरगावकर यांनी असंख्य पुरावे उपलब्ध करून नव्याने लेखनबद्ध केलेल्या कदीम बाबूल हिंद (हिंदचा प्राचीन दरवाजा) अर्थात गेट वे आॅफ दाभोळ या ऐतिहासिक दस्तऐवज ठरू पाहणाऱ्या अभ्यासपूर्ण पुस्तकाचे प्रकाशन एम. आय. बी. गर्ल्स हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, खेड येथे बज्म - ए - इमदादिया संस्थेच्यावतीने कतार येथील जागतिक कीर्तीचे उद्योजक, शिक्षणप्रेमी हसनभाई चौगुले यांच्या हस्ते झाले.यावेळी प्राचार्या शांता सहस्त्रबुद्धे, प्रा. मुनीर अहमद अल्लाबक्ष, डॉ. अमीन दळवी, डॉ. उस्मान पन्छी, सचिव कमाल मांडलेकर, धीरज वाटेकर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात कुरआन पठण आणि स्वागतगीताने झाली. बज्म - ए - इम्दादिया संस्थेचे चेअरमन ए. आर. डी. खतीब यांनी प्रास्ताविक केले. फारसे शिक्षण नसताना अण्णा यांनी केलेले पुराव्यासहचे हे लेखन पीएच. डी.च्या अभ्यासकाला मार्गदर्शक ठरेल, असे प्रा. सहस्त्रबुद्धे यांनी नमूद केले.डॉ. दाऊद दळवी यांच्या संदेशाचे वाचन प्रा. सदाशिव टेटविलकर यांनी केले. आपली संपूर्ण सकारात्मक ऊर्जा वापरुन आपण कोणतेही काम सहज यशस्वी करू शकतो, असे उद्योगपती हसन चौगुले यांनी सांगून अण्णांच्या कार्याचे कौतुक केले. या पुस्तकाच्या दाभोळ गावात आपण आगामी काळात शैक्षणिक संकुल उभारण्यासाठी यशस्वी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. पुस्तकाच्या तब्बल २०० प्रती त्यांनी आपल्या परिचयातील अभ्यासूना भेट देण्यासाठी त्यांनी विकत घेतल्या. विविध ट्रस्टनी केलेल्या मदतीमुळे प्रकाशनाच्या दिवशी हा अमूल्य संदर्भमूल्य असलेला ग्रंथ सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिला गेल्याने या पुस्तकाची पहिली आवृत्ती जवळपास कार्यक्रमस्थळीच संपली. पुस्तकातील छायाचित्रांकरिता विलास महाडिक, डी. टी. पी. मुखत्यार मुल्लाजी यांनी सहकार्य केले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शाबुद्दिन परकार यांनी केले. (प्रतिनिधी)
कदीम बाबूल हिद अर्थात गेट वे आॅफ दाभोळ हा ऐतिहासिक दस्तऐवज ठरू पाहणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन उद्योजक हसनभाई चौगुले यांच्याहस्ते झाले.