चिपळुणातील पुस्तक विक्रेत्यांच्या मदतीला धावले प्रकाशक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:37 AM2021-08-18T04:37:20+5:302021-08-18T04:37:20+5:30
चिपळूण : शहरातील पूरग्रस्तांसाठी मदतीचाही महापूर सुरू झाला आहे. अनेक संस्था, संघटना व तरुण मंडळे मदतीसाठी सरसावली आहेत. अशातच ...
चिपळूण : शहरातील पूरग्रस्तांसाठी मदतीचाही महापूर सुरू झाला आहे. अनेक संस्था, संघटना व तरुण मंडळे मदतीसाठी सरसावली आहेत. अशातच येथील पुस्तक विक्री करणाऱ्या व्यावसायिकांच्या मदतीसाठी मुंबई, ठाणे, पुणे येथील पुस्तक प्रकाशक धावले आहेत. पूरग्रस्त पुस्तक विक्रेत्यांना विविध प्रकारच्या पुस्तकांच्या स्वरूपात मदत दिली जात आहे.
कोरोनामुळे अगोदरच व्यापारी अडचणीत आले आहेत. या परिस्थितीमुळे शाळा व वाचनालये बंद राहिल्याने त्याचा थेट परिणाम पुस्तक विक्रीच्या व्यवसायावर झाला. त्यातच महापुरामुळे या व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. चिपळुणातील सर्वच पुस्तक विक्रेते अडचणीत आले आहेत. सद्यस्थितीत बाजारपेठेतील पुस्तक विक्रीचे एकही दुकान सुरक्षित राहिलेले नाही.
या पार्श्वभूमीवर मेहता प्रकाशनसह अन्य काही प्रकाशकांनी येथे भेट देऊन प्रत्यक्ष स्थितीची पाहणी केली आणि पुस्तके भेट देत, अनोख्या स्वरूपाची मदत देऊ केली आहे. याविषयी अक्षर साहित्याचे पुष्कर पिंपुटकर यांनी सांगितले की, महापुराने येथे दोन दिवस हाहाकार माजविला होता. भीषण महापुराने हजारो कुटुंबे उद्ध्वस्त झाली. यामध्ये पुस्तक विक्रेत्यांचेही मोठे नुकसान झाले. अनेक वर्षे पुस्तक क्षेत्रात कार्यरत असलेल्या अक्षर साहित्याचेही सुमारे पंधरा लाखांचे नुकसान झाले आहे. कथा, कादंबरी, धार्मिक, बाल वाङ्मय, पर्यटन या विषयावरील हजारो पुस्तके पुराच्या पाण्यात पूर्णतः खराब झाली. आता काही प्रकाशक मदतीचा हात पुढे घेऊन येत आहेत. आतापर्यंत मेहता प्रकाशन, मनोविकास पुणे, दिलीपराज प्रकाशन व अन्य काही प्रकाशक मदत देत असल्याने विक्रेत्यांना त्याचा आधार मिळत आहे.