कडधान्ये, गळीत धान्यासाठी प्रयत्न, यावर्षी बदलत्या वातावरणाचा पिकाला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 04:35 PM2019-12-25T16:35:56+5:302019-12-25T16:37:57+5:30
यावर्षी झालेला अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, त्यातच भर पडली ती क्यार वादळाची. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. खरिपातील मुख्य असलेल्या भातपिकाचे मोठे नुकसान झाले. या नुकसानातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी चालू रब्बी हंगामामध्ये हरभरा, कुळीथ यासारखी कडधान्य पिके व भुईमूग, मोहरीसारखी गळीतधान्य पिके घेऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याचा दृष्टीने तालुका कृषी विभाग सरसावला असून, शेतकºयांना त्यासाठी मोफत बियाणे दिले जात आहे.
अनिल कासारे
लांजा : यावर्षी झालेला अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, त्यातच भर पडली ती क्यार वादळाची. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. खरिपातील मुख्य असलेल्या भातपिकाचे मोठे नुकसान झाले. या नुकसानातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी चालू रब्बी हंगामामध्ये हरभरा, कुळीथ यासारखी कडधान्य पिके व भुईमूग, मोहरीसारखी गळीतधान्य पिके घेऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याचा दृष्टीने तालुका कृषी विभाग सरसावला असून, शेतकऱ्यांना त्यासाठी मोफत बियाणे दिले जात आहे.
कोकणातील शेतकऱ्यांचे पावसाळ्यातील मुख्य पीक म्हणजे भात आहे. पावसाने वेळेवर व समाधानकारक साथ दिली तर शेतकरी आपल्या शेतातून भात पिकाच्या रूपाने सोनं पिकवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकतो. मात्र, यावर्षी उशिरापर्यंत पडलेला पाऊस व त्यानंतर झालेली अतिवृष्टी, त्यातून शिल्लक राहिलेली भातशेती ऐन कापणीच्या वेळी क्यार वादळ, अवकाळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडातुन घास हिसकावला गेला आणि शेतकरी गर्भगळीत झाला. मायबाप सरकार नुकसान भरपाई कधी देणार, याकडे कोकणातील शेतकऱ्यांचे आता लक्ष लागून राहिले आहे.
वातावरणात सातत्याने होणाऱ्या बदलांचा कोकणातील आंबा, काजू पिकाला नेहमीच फटका बसतो. या भयावह परिस्थितीवर मात करून शेतकऱ्यांला दिलासा देण्याच्या दृष्टीने लांजा कृषी विभागाने एक पाऊल पुढे टाकत रब्बी हंगामातील पिके घेण्याच्या दृष्टीने हरभरा, कुळीथ, तसेच गळीत पिके घेण्यासाठी भुईमूग, मोहरी यासारखी पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांची मानसिकता बनवून त्यांना त्यासाठीचे मोफत बियाणे दिले आहे. भातपिकाच्या काढणीनंतर अगदी अंग ओलितावर सुध्दा हरभरा उत्पादन घेता येते. यातून अधिक उत्पन्न कसे मिळवता येईल, यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे.
तालुका कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी उचललेले हे पाऊस कौतुकास्पद आहे. शेतकऱ्यांनीही या उपक्रमाला भरभरून साथ दिली आहे. सुमारे ३५ गावामधील शेतकरी यात सहभागी झाले असून, जवळपास २० हेक्टर क्षेत्रावर हरभरा, ३० हेक्टर क्षेत्रावर भुईमूग, १० हेक्टर क्षेत्रावर मोहरी लागवड करण्यात येणार आहे.
या पिकांबाबत प्रात्यक्षिकेही घेण्यात आली आहेत. लांजा तालुक्यातील शेतकऱ्यांना एकूण १४ क्विंटल हरभरा, ३० क्विंटल भुईमूग व २० किलो मोहरी बियाण्याचे मोफत वाटप करण्यात आले आहे. कृषी विभागाच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
लांजा तालुक्यातील ३५ गावातील शेतकऱ्यांनी या लागवडीचा फायदा घेतला आहे. यासाठी उपविभागीय कृषी अधिकारी गुरूदत्त काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील कृषी विभागाचे सर्व अधिकारी, कृषी सहाय्यक यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेताना शेतकऱ्यांचा फायदा कसा होईल, याकडे विशेष लक्ष दिले आहे.
शेतकऱ्यांसाठी मोफत बियाणे
बदलत्या वातावरणाचा फटका कोकणातील खरीप पिकाला बसला आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने लांजा कृषी विभागाने एक पाऊल पुढे टाकत रब्बी हंगामातील पिके घेण्याच्या दृष्टीने हरभरा, कुळीथ तसेच गळीत पिके घेण्यासाठी भुईमूग, मोहरी यासारखी पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांची मानसिकता बनवून त्यांना यासाठी मोफत बियाणे दिले आहे.