कामथे उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना टेस्टिंग व्हॅनचा पंचनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:33 AM2021-05-21T04:33:10+5:302021-05-21T04:33:10+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : आमदार भास्कर जाधव यांनी गुरुवारी कामथे उपजिल्हा रुग्णालयात जाऊन कोरोना टेस्टिंग व्हॅनची पाहणी केली. ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : आमदार भास्कर जाधव यांनी गुरुवारी कामथे उपजिल्हा रुग्णालयात जाऊन कोरोना टेस्टिंग व्हॅनची पाहणी केली. त्यावेळी अजूनही दिवसाला सातशे ते आठशे इतकेच अहवाल मिळतात, हे लक्षात आल्यावर त्यांनी नाराजी व्यक्त करत ही संख्या वाढण्यासाठी सूचना केल्या. तसेच उत्तर रत्नागिरीतील स्वॅबही कामथे उपजिल्हा रुग्णालयात पाठवावेत, असे आवाहन जाधव यांनी केले.
याआधी झालेल्या आढावा बैठकीत आमदार जाधव यांनी चिपळूण व खेड येथील तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना कामथेमध्ये जाऊन या मोबाइल टेस्टिंग व्हॅन पाहण्याची सूचना केली होती. त्यांच्या सूचनेनुसार अधिकाऱ्यांनी व्हॅनमार्फत होणाऱ्या तपासणीची माहिती घेतली; पण त्यावर समाधान न झाल्याने गुरुवारी आमदार जाधव कामधे उपजिल्हा रुग्णालयात पोहोचले. मोबाइल व्हॅनमध्ये जाऊन त्यांनी पाहणी केली व या ठिकाणी असलेल्या एमएससी व्हायरॉलॉजिल्ट ऐश्वर्या पाखले यांच्याकडून माहिती घेतली असताना अजूनही दिवसाला ७०० ते ८०० अहवाल मिळतात. एवढीच क्षमता असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी प्रश्नांचा भडीमार केला. त्यावेळी पाखले यांनी सांगितले की, अधिक नमुने आले तर आम्ही दुसरी व्हॅन मागवू; पण एकही अहवाल मागे ठेवणार नाही. ही माहिती घेत असताना अजूनही गुहागर, दापोली, खेड, मंडणगड येथील नमुने हे चिपळूणला तपासण्यासाठी येत नाहीत, असे लक्षात आले. त्यांनी ताबडतोब जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी बोलणी करून नमुने चिपळूणला पाठविण्याबाबत त्या त्या ठिकाणच्या तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना सूचना करण्याकरिता सांगण्यात आले.
रत्नागिरी येथील तपासणी केंद्रावर ताण पडत असल्याने हजारो नमुन्यांचे अहवाल आठवडाभर मिळत नाहीत. परिणामी, एखादा रुग्ण पॉझिटिव्ह असल्यास त्याच्यावर वेळेत उपचार होत नाहीत. त्यामुळे सर्वांनी चिपळूणला नमुने तपासण्यासाठी पाठवावेत, असे आवाहन आमदार जाधव यांनी केले. यावेळी त्यांनी रुग्णालयाच्या परिसरात उभारण्यात येत असलेल्या ऑक्सिजन प्लांटच्या कामाचीही पाहणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारे, गटविकास अधिकारी प्रशांत राऊत, मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते, तालुका आरोग्य अधिकारी ज्योती यादव, बांधकाम विभागाच्या उपअभियंता नीलम माने, कामथे रुग्णालयाचे डॉ. असित नरवणे उपस्थित होते.
--------------------------------
चिपळूण तालुक्यातील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील काेराेना टेस्टिंग व्हॅनची आमदार भास्कर जाधव यांनी पाहणी केली़