चिपळुणातही १६० जणांच्या नुकसानाचे पंचनामे पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:33 AM2021-05-19T04:33:17+5:302021-05-19T04:33:17+5:30
चिपळूण : सोसाट्याच्या वाऱ्यासह दाखल झालेल्या तौक्ते वादळामुळे येथे वृक्ष, वीज खांब कोसळून मोठी हानी झाली. या नुकसानाचे पंचनामे ...
चिपळूण : सोसाट्याच्या वाऱ्यासह दाखल झालेल्या तौक्ते वादळामुळे येथे वृक्ष, वीज खांब कोसळून मोठी हानी झाली. या नुकसानाचे पंचनामे केले जात असून, मंगळवारी पहिल्याच दिवशी १६० जणांच्या नुकसानाची नोंद घेण्यात आली. अजूनही तालुक्यातील विविध भागात पंचनाम्याची प्रक्रिया सुरू आहे.
तौक्ते वादळात तालुक्यातील विविध ठिकाणी हानी झाली आहे. विशेषतः पूर्व विभाग व खाडी पट्ट्यात मोठे नुकसान झाले आहे. शहरी भागासह तालुक्यातील तोंडली, वहाळ, आगवे, पालवण, पाचाड, कात्रोळी, खोपड, मोरवणे, निर्व्हाळ, कोंडमळा, शिरगाव, दोनवली, नांदगाव बु., रावळगाव, पेढांबे, कळकवणे, धामणवणे, परशुराम, कळंबस्ते, खेर्डी आदी गावांमध्ये घरे व गोठ्यांचे नुकसान झाले आहे. तसेच महावितरणलाही मोठा फटका बसला आहे. सुमारे २०० हून अधिक वीजखांब कोसळले आहेत. त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. मंगळवारी तालुक्यातील काही भागात दिवसभर वीज पुरवठा खंडित होता. या घटनेची दखल गंभीरपणे घेत महसूलकडून पंचनाम्याची प्रक्रिया सुरू केली आहे.