नुकसानाचे पंचनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:31 AM2021-05-21T04:31:57+5:302021-05-21T04:31:57+5:30

दापोली : तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम मंगळवारपासून सुरू करण्यात आले आहे. या चक्रीवादळाने तालुक्यातील मुरुड, हर्णै, ...

Punchnama of loss | नुकसानाचे पंचनामे

नुकसानाचे पंचनामे

Next

दापोली : तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम मंगळवारपासून सुरू करण्यात आले आहे. या चक्रीवादळाने तालुक्यातील मुरुड, हर्णै, पाजपंढरी, आंजर्ले, केळशी, वेळास, बाणकोट, देव्हारे आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

मच्छीमारांचे नुकसान

राजापूर : नुकत्याच झालेल्या तौक्ते चक्रीवादळाने तालुक्यातील साखरी नाटे, आंबोळगड येथील सात मच्छीमारांचे २ लाख ७२ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. यात आंबोळगड येथील ४ मच्छीमारांचे तर साखरी नाटे येथील ३ मच्छीमारांचे अंशत: व जाळ्यांचे नुकसान झाले आहे.

विद्युत खांबांची दुरवस्था

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते ग्रामपंचायत क्षेत्राच्या बहुतांशी प्रभागातील महावितरण कंपनीच्या विद्युत खांबांची दुरवस्था झाली आहे. सध्या मान्सूनपूर्व कामाला सुरुवात झाली असून विद्युत तारांभोवतीची धोकादायक झाडे व फांद्या तोडण्याचे काम सुरू आहे. याचबरोबर धोकादायक खांबही बदलावेत, अशी मागणी होत आहे.

विहीर ढासळली

साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील कनकाडी येथे तौक्ते चक्रीवादळाने सार्वजनिक विहिरीचे मोठे नुकसान केले असून ही विहीर पूर्णपणे ढासळली आहे. या विहिरीमुळे गावातील ब्राह्मणवाडी आणि शिंदेवाडी येथील ग्रामस्थांना पाणीपुरवठा होत होता. परंतु वादळी पावसाने ही विहीर ढासळली आहे.

चार दिवसानंतर वीजपुरवठा

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे गावालाही चक्रीवादळाचा फटका मोठ्या प्रमाणावर बसला. रविवारी सकाळी १०च्या सुमारास वादळ सुरू होताच वीजपुरवठा खंडित झाला. अनेक ठिकाणी विद्युत तारा तुटल्या होत्या. अखेर ५४ तासानंतर या भागातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात महावितरणच्या कर्मचाऱ्यांना यश आले.

भरपाईची मागणी

गुहागर : चक्रीवादळाने तालुक्यात अनेक घरांचे अंशत: नुकसान केले आहे. गोठे तसेच सार्वजनिक मालमत्तांचेही नुकसान झाले आहे. अनेक झाडांचे अजूनही पंचनामे झालेले नाहीत. यंत्रणांनी वस्तुनिष्ठ पंचनामे करून योग्य भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

उकाडा वाढला

रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळामुळे गेल्या चार दिवसांपासून सलग पाऊस सुरू आहे. मात्र गुरुवारी पावसाने विश्रांती घेतली आणि सकाळपासूनच कडाक्याचे ऊन पडायला सुरुवात झाली. त्यामुळे दिवसभर पुन्हा कमालीचा उकाडा होऊ लागला. सध्या उष्णता अधिक वाढू लागली आहे.

खरेदीची लगबग

रत्नागिरी : कृषीविषयक सेवांची दुकाने आता अधिक काळ सुरू रहाणार आहेत. सकाळी ७ ते ११ या वेळेत दुकाने सुरू असल्याने दुर्गम भागातील शेतकऱ्यांना शहराच्या ठिकाणी येऊन खरेदी करणे त्रासदायक होत होते. मात्र आता दुकानांची वेळ वाढवून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ग्रामसेवकांमध्ये समाधान

रत्नागिरी : जिल्हा परिषदेतील ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी यांच्या कायम प्रवास भत्त्यात वाढ करून देऊन १,५०० रुपये करण्याचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळात घेण्यात आला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी यांच्यामध्ये समाधान पसरले आहे.

कोरोना साथ आटोक्यात

मंडणगड : तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या आता अतिशय कमी झाली आहे. गेल्या काही दिवसात रुग्णसंख्या शून्य झाली आहे. त्याचबरोबर मृत्यूचा दरही शून्यावर आला आहे. ही साथ आता आटोक्यात येऊ लागल्याने तालुक्यामधून दिलासा मिळाल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत.

Web Title: Punchnama of loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.