रत्नागिरी : पुंडलिकाचे मंदिर पाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 06:32 PM2019-07-12T18:32:32+5:302019-07-12T18:33:11+5:30
अडीच फुट रुंदीच्या भिंती व त्याला घुमट सदृश्य कळस व पाण्याच्या प्रवाहाचा मारा चुकविण्यासाठी होडीच्या आकाराचा चौथरा व चारही बाजूला पाणी हे दृश्य विहंगम असते.
अरुण आडिवरेकर ।
रत्नागिरी : भक्त पुंडलिकाचे मंदिर चक्क दोन दिवस पाण्यात राहिल्याची घटना राजापूर येथे घडली. अर्जुना नदीच्या पात्रात असणारे पुंडलिकाचे मंदिर दोन दिवस पुराच्या पाण्याने वेढलेले होते.
पंढपुरातील विठ्ठलाच्या मंदिरासमोर जसे पुंडलिकाचे मंदिर उभारण्यात आले आहे. तसेच राजापूर येथील विठ्ठल मंदिरासमोर अर्जुना नदीच्या पाण्यात मध्यभागी फार पुरातन पुंडलिकाचे मंदिर आहे. पावसाळ्यात येणाऱ्या पुरामध्येही हे मंदिर आपले अस्तित्व टीकवून आहे. अडीच फुट रुंदीच्या भिंती व त्याला घुमट सदृश्य कळस व पाण्याच्या प्रवाहाचा मारा चुकविण्यासाठी होडीच्या आकाराचा चौथरा व चारही बाजूला पाणी हे दृश्य विहंगम असते.
राजापुरात ज्या वेळेला गंगा येते त्यावेळी प्रथम उन्हाळेवर गरम पाण्याची आंघोळ करणे, त्यानंतर गंगेवर स्नान करून पुंडलिकाचे दर्शन घेऊन धूतपापेश्वरावर अभिषेक केल्यास काशी यात्रेची पूर्तता होते अशी राजापूरकरांची श्रद्धा आहे. पावसाळ्यात मोठ्या पुराच्या वेळी येथील दृश्य भीतीदायक असते पण कमी पाणी असताना हा परिसर म्हणजे नैसर्गिक सौंदर्याने भरून गेलेला असतो. गगनगिरी महाराज गंगा भेटीला येत त्यावेळी या मंदिराच्या त्रिकोणी चौथºयावर बसून भक्तांना दर्शन देत असत, असेही सांगण्यात येते.
राजापुरात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे अर्जुना नदीसह कोदवली नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे अर्जुना नदीला पूर येऊन त्याचे पाणी जवाहर चौकात शिरले. पुराच्या पाण्यामुळे अर्जुना नदी पात्रात असणाºया पुंडलिकाच्या मंदिरालाही पाण्याने वेढा घातला. पुराचे पाणी ओसरू लागल्यानंतर मंदिराभोवतालचे पाणीदेखील ओसरू लागले आहे.