जिल्ह्यातील १५३० शेतकऱ्यांकडून १७ हजार ७८५ क्विंटल भाताची खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:29 AM2021-03-21T04:29:20+5:302021-03-21T04:29:20+5:30
रत्नागिरी : रत्नागिरी मार्केटिंग फेडरेशनतर्फे जिल्ह्यातील १५३० शेतकऱ्यांकडून १७ हजार ७८५.४५ क्विंटल भात खरेदी करण्यात आला आहे. ...
रत्नागिरी : रत्नागिरी मार्केटिंग फेडरेशनतर्फे जिल्ह्यातील १५३० शेतकऱ्यांकडून १७ हजार ७८५.४५ क्विंटल भात खरेदी करण्यात आला आहे. जिल्ह्यातील १५ केंद्रांवर भात खरेदी सुरू असून, प्रतिक्विंटल १८६८ रुपये दर देण्यात येत आहे. यावर्षी २२ हजार क्विंटल धान्य खरेदीचे उद्दिष्ट असून, दि.३१ मार्चपर्यंत अवधी असल्याने उद्दिष्टपूर्ती होण्याची शक्यता आहे.
दी महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनतर्फे शेतकऱ्यांकडून शासन ठरवून देईल, त्या दराने शेतमालाची खरेदी करून पुरवठा समितीकडे वितरित करण्यात येते. या योजनेसाठी शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सन २०१३-१४ मध्ये विक्रमी प्रतिसाद लाभला होता. त्यावर्षी २४ हजार ४९८.४६ क्विंंटल भाताची खरेदी झाली होती. यासाठी शासनाने प्रतिक्विंटल १३१० रुपये दर दिला होता. त्यावेळी जिल्ह्यातील १९५९ शेतकऱ्यांनी आपल्याकडील भाताची विक्री केली होती. मात्र, भात गोडावूनमध्ये शिल्लक राहिल्याने पुढील दोन वर्षे भाताची खरेदीच झाली नव्हती.
दरवर्षीप्रमाणे यंदाही जिल्ह्यात खरेदी-विक्री संघ आणि विविध कार्यकारी सोसायटी यांच्यातर्फे धान्याची खरेदी करण्यात येत आहे. खेड तालुक्यातील १९० शेतकऱ्यांकडून ३९६४ क्विंटल, दापोली येथे ६४ शेतकऱ्यांकडून ६०६ आणि केळशी येथील १९८ शेतकऱ्यांकडून १११४.८०, गुहागर येथील १८७ शेतकऱ्यांकडून १२१७.६०, रत्नागिरी येथील १५३ शेतकऱ्यांकडून १२७२,४०, संगमेश्वर येथील ११९ शेतकऱ्यांकडून १६००.४०, लांजा येथील २२ शेतकऱ्यांकडून १३३.६०, राजापुुरातील ४६ शेतकऱ्यांकडून ४९५.०५, पाचल येथील ३६ शेतकऱ्यांकडून ४७०.६०, चिपळुणातील १५६ शेतकऱ्यांकडून २५४८.४०, मिरवण येथील १०४ शेतकऱ्यांकडून १६६७.२० आकलेतील ४० शेतकऱ्यांकडून ४३९.२०, शिरगाव येथील १७८ शेतकऱ्यांकडून १६४८.८०, शिरळ येथील ४१ शेतकऱ्यांकडून ६०८.४० क्विंटल भाताची खरेदी आतापर्यंत करण्यात आली. मार्केटिंग फेडरेशनने यावर्षी २२ हजार क्विंटल धान्य खरेदीचे उद्दिष्ट निश्चित केले असून, ४ हजार २१४.५५ क्विंटल भात खरेदीची गरज असून, दि. ३१ मार्चपर्यंत पूर्तता होण्याची शक्यता आहे.
..................
यावर्षी भात खरेदीसाठी शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दि. ३१ मार्चपर्यंत ही खरेदी सुरू राहणार आहे. त्यामुळे उद्दिष्टपूर्तीच्या समीप पोहोचलो आहोत. भात खरेदीनंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा करण्यात येत आहेत. वहाळ वगळता अन्य सर्व केंद्रांवर चांगला प्रतिसाद लाभला आहे.
- पी. जे. चिले, अधिकारी, दी मार्केटिंग फेडरेशन, रत्नागिरी.