शिवसेनेतील बड्या नेत्याच्या भावाकडून नाणारमध्ये जमीन खरेदी : नीलेश राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 03:32 PM2020-09-24T15:32:28+5:302020-09-24T15:34:50+5:30

राजापूर तालुक्यातील नाणार येथील नियोजित रिफायनरी प्रकल्पासाठी एक कंपनी जागा खरेदी करत असून, ही कंपनी शिवसेनेतील एका बड्या नेत्याच्या भावाची असल्याचा गौप्यस्फोट माजी खासदार आणि भाजपचे प्रदेश सचिव नीलेश राणे यांनी एका पत्रकार परिषदेत केला.

Purchase of land in Nanar from the brother of a big leader of Shiv Sena | शिवसेनेतील बड्या नेत्याच्या भावाकडून नाणारमध्ये जमीन खरेदी : नीलेश राणे

शिवसेनेतील बड्या नेत्याच्या भावाकडून नाणारमध्ये जमीन खरेदी : नीलेश राणे

Next
ठळक मुद्देशिवसेनेतील बड्या नेत्याच्या भावाकडून नाणारमध्ये जमीन खरेदी : नीलेश राणे यांचा आरोप प्रकल्प परिसरातील जमिनी शिवसैनिकांनीच परप्रांतीयांच्या घशात घातल्या

रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील नाणार येथील नियोजित रिफायनरी प्रकल्पासाठी एक कंपनी जागा खरेदी करत असून, ही कंपनी शिवसेनेतील एका बड्या नेत्याच्या भावाची असल्याचा गौप्यस्फोट माजी खासदार आणि भाजपचे प्रदेश सचिव नीलेश राणे यांनी एका पत्रकार परिषदेत केला.

नाणार प्रकल्पाचा अध्यादेश रद्द झाला, नाणार विषय संपला असे सांगून शिवसेनेचे मंत्री, खासदार, आमदार स्थानिकांची दिशाभूल करीत आहेत. मात्र रिफायनरी कंपनीकडून मुख्यमंत्री कार्यालयाबरोबर प्रकल्पाबाबत सकारात्मक चर्चा सुरु असून, हा प्रकल्प रायगड नाही तर नाणारमध्येच होणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. शिवसैनिकच येथील जागा परप्रांतीयांच्या घशात घालत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

राणे यांनी रत्नागिरीमध्ये ही पत्रकार परिषद घेतली. शिवसेनेने रिफायनरी प्रकल्पाला सुरूवातीला विरोध केला. परंतु आता त्यांच्याच आशीवार्दाने नाणारमध्ये परप्रांतीयांनी जमिनी खरेदी केल्या आहेत. आता शिवसेनाच रिफायनरी प्रकल्प आणत असल्याचे राणे यांनी सांगितले. रिफायनरीला जागा मिळवून देण्यासाठी एक कंपनी पाटर्नरशिपमध्ये जागा खरेदी करत आहे. त्याचे संचालक हे शिवसेनेच्या बड्या नेत्याचे भाऊ आहेत.

या कंपनीतर्फे १४०० एकर जमिनीची खरेदी करण्यात आली आहे. खरेदीचे व्यवहार विविध १७ लोकांशी करण्यात आले आहेत. लॉकडाऊनमुळे सध्या त्यांची कार्यालये बंद आहेत. मात्र या बड्या नेत्याचे नातेवाईकच नाणार जमिनीच्या व्यवहारात आहेत. प्रकल्प बंद करण्याचे नाटक मात्र सुरु आहे.

सुरुवातीला विरोध दाखवायचा, लोकांना भडकावायचे आणि नंतर प्रकल्प आणायचा हा शिवसेनेचा जुना उद्योग आहे. रिफायनरीसाठीच्या जमिनी परप्रांतियांना देणाऱ्यांमध्ये शिवसेनेचेच पदाधिकारी सहभागी आहेत. या प्रकल्पाला लागणारी ८ हजार हेक्टर जमीन शिवसैनिकांनी परप्रांतीयांच्या घशात घातल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

एका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने पैसे कमवण्यासाठी उपळे गावातील जमिनीला स्वत:चे कुळ म्हणून लावून घेण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. याबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. स्थानिक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमुळे परप्रांतीय जमीन खरेदीसाठी रत्नागिरी जिल्ह्यात आले आहेत.

या व्यवहारात स्थानिक शेतकरी मात्र उपेक्षित राहिले आहेत. रिफायनरी प्रकल्पाला आणखी दोन हजार हेक्टर जागेची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. आता प्रकल्पाचा फक्त करार करणे बाकी आहे, असेही ते म्हणाले.

राजापूर तालुक्यातील गोवळ, बारसू, सोलगाव एमआयडीसीसाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचे पॉवर आॅफ एटर्नी म्हणून बंद सातबाऱ्याच्या जमिनींची विक्री केली आहे. संबंधित जमीन विक्री करण्यासाठी परवानगी नसते.

या विषयासंदर्भात प्रांताकडे तक्रार दाखल करण्यात आली असून त्याबाबत सुनावणी सुरु आहे. प्रांतांकडे तक्रार केल्यानंतरही जमीन खरेदी-विक्रीची कार्यवाही सुरु होती. जमीन व्यवहारातील मोठा गैरप्रकार असल्याचा आरोप नीलेश राणे यांनी केला आहे.

नीलेश राणे यांचे आव्हान

प्रकल्पाला कडाडून विरोध केल्यामुळे शिवसेना सरळ मार्गाने हा प्रकल्प आणू शकत नाही. प्रकल्प आणण्यासाठी त्यामुळे वेगळा फंडा राबविण्यात येत आहे. जे एन्रॉनचे झाले तेच रिफायनरीचे होईल, असेही राणे यांनी सांगून उच्चस्तरावर सुरु असलेल्या बैठकांवरून निदर्शनास येत असल्याचे सांगितले. याबाबतची माहिती गल्लीतील शिवसेनेच्या खासदारांना कशी समजणार? प्रकल्पाचा विषय संपला असे भासवणाऱ्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाबरोबर जी चर्चा सुरु आहे ते खोटे ठरवून दाखवावे, असे आव्हान नीलेश राणे यांनी यावेळी दिले.

Web Title: Purchase of land in Nanar from the brother of a big leader of Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.