रत्नागिरीकरांना लवकरच शुद्ध पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:30 AM2021-04-06T04:30:39+5:302021-04-06T04:30:39+5:30
रत्नागिरी : शहरवासीयांना आता बारमाही स्वच्छ पाणीपुरवठा करण्यासाठी पावणेदोन कोटी रुपये खर्च करून साळवी स्टॉप येथील जलशुद्धिकरण ...
रत्नागिरी : शहरवासीयांना आता बारमाही स्वच्छ पाणीपुरवठा करण्यासाठी पावणेदोन कोटी रुपये खर्च करून साळवी स्टॉप येथील जलशुद्धिकरण केंद्राची दुरूस्ती सुरू आहे. नगरपरिषदेतर्फेे लवकरच शंभर टक्के शुद्ध पाणीपुरवठा केला जाणार आहे. पाणी तपासण्यासाठी स्वतंत्र प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे.
शहरातील साळवी स्टॉप येथे असलेल्या नगरपरिषदेच्या जलशुध्दिकरण केंद्रात दिवसाला १५ एमएलडी पाणी शुद्ध करण्याची क्षमता आहे. मात्र, गेल्या २५ वर्षांत जलशुध्दिकरण केंद्राची दुरूस्ती न झाल्याने जलशुध्दिकरणाचा दर्जा खालावला आहे. शहरवासीयांच्या आरोग्याचा प्रश्न असल्याने नगराध्यक्ष प्रदीप साळवी, सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे आणि पाणी अभियंता अविनाश भोईर यांच्या संयुक्त बैठकीत जलशुध्दिकरण केंद्र दुरूस्तीचा निर्णय घेण्यात आला. एरिएशन फाऊंटन दुरूस्ती, वॉटर चॅनल, फ्लॅश मिक्सर, फिल्टर बेल्ट, बॅकवॉश युनिट, व्हॉल्व्ह, क्लोरिन युनिटची यांत्रिक व विद्युत दुरूस्ती यामुळे हे जलशुद्धिकरण केंद्र नगर परिषदेचे अत्याधुनिक फिल्टर हाऊस बनणार आहे. सध्या दिवसाला ११ एमएलडी पाणी शुद्ध करून पुरवठा केला जात आहे. मात्र, नवीन विद्युत पंप बसविल्यामुळे क्षमता १५ ते ते १८ एमएलडी इतकी होणार आहे.
शुद्धिकरण प्रक्रिया
शीळ जॅकवेलमधून पाणी एरिएशन फाैंटनमध्ये येते ते पाणी वॉटर फ्लॅश मिक्सरमध्ये सोडल्यावर पाण्यातील कार्बंनडाय ऑक्साईड व इतर गॅस निघून जाण्यास मदत होते. मात्र, ऑक्सिजन मिसळेल, याची काळजी घेण्यात येते. वॉटर फ्लॅश मिक्सरमध्ये काही घटक पाण्यात मिसळले जातात नंतर पाणी मोठ्या टाकीत सोडण्यात येते. पाण्यातील गढूळपणा निघून जाऊन स्वच्छ पाणी वॉटर चॅनलद्वारे फिल्टर बेल्टमध्ये येते, या बेल्टला चार थर असतात. त्यामध्ये फिल्टर होऊन साठवणूक टाकीत शंभर टक्के शुद्ध पाणी येते. पाण्यात क्लोरिन मिसळल्याने पाणी पिण्यासाठी सुरक्षित होते.
...........................
फिल्टर हाऊसच्या दुरूस्तीसाठी एक कोटी ७५ लाखांचा निधी देण्यात आला असून संपूर्ण जलशुध्दिकरण केंद्राची दुरूस्ती करण्यात आली आहे. येत्या दोन आठवड्यात जलशुध्दिकरण केंद्रातून शहरवासीयांना शुद्ध पाणी पाणीपुरवठा केला जाणार आहे. पावसाळ्यात गढूळ पाणीही फिल्टर झाल्यानंतर शंभर टक्के शुद्ध स्वरुपात लोकांपर्यंत जाईल.
- प्रदीप साळवी, नगराध्यक्ष, रत्नागिरी