गुहागर पंचायत समिती सभापतिपदी पूर्वा निमूणकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:32 AM2021-03-17T04:32:03+5:302021-03-17T04:32:03+5:30
फोटो कॅप्शन : सभापती निवड झाल्यानंतर पूर्वा निमूणकर याचे विक्रांत जाधव, विनायक मुळे, सुनील पवार, पांडुरंग कापसे यांनी अभिनंदन ...
फोटो कॅप्शन : सभापती निवड झाल्यानंतर पूर्वा निमूणकर याचे विक्रांत जाधव, विनायक मुळे, सुनील पवार, पांडुरंग कापसे यांनी अभिनंदन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गुहागर : गुहागर पंचायत समितीच्या सभापतिपदासाठी पूर्वा निमूणकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची सभापतिपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडप्रक्रिया प्रांताधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पूर्वा निमूणकर यांच्या निवडीने गुहागर पंचायत समितीवर शिवसेना पक्षाचा पहिला सभापती होण्याचा मान मिळाला.
सभापतिपदासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण माजी सभापती विभावरी मुळे यांनी सभापतिपदाचा राजीनामा दिल्याने यापूर्वी राष्ट्रवादीतर्फे सभापतीपद भुषविलेल्या पूनम पाष्टे व शिवसेनेच्या पूर्वा निमूणकर यांची नावे चर्चेत होती. राष्ट्रवादी पक्षातून निवडून आलेले सर्वाधिक पाच सदस्य असल्याने यापूर्वी सभापतिपदाचा अनुभव असलेल्या पूनम पाष्टे यांची सभापतिपदी, तर उपसभापतिपदी शिवसेनेचे रवींद्र आंबेकर यांची निवड होणार असल्याची चर्चा होती. पूर्वी निमूणकर यांच्या सभापती निवडीवेळी पूनम पाष्टे अनुपस्थित असल्याने पंचायत समिती आवारात याबाबत चर्चा सुरू होती.
या निवडीनंतर शिवसेना तालुकाध्यक्ष सचिन बाईत म्हणाले की, माझी तालुकाध्यक्ष निवड झाल्यानंतर दुग्धशर्करा योग अनेकदा येत आहे. आमदार भास्कर जाधव निवडून आल्याने शिवसेनेला पहिला आमदार गुहागर मतदारसंघातून मिळाला. त्यानंतर १५ दिवसांसाठी का होईना महेश्वर नाटेकर यांची जिल्हा परिषद अध्यक्षपदी प्रभारी निवड झाली. मंगळवारी पंचायत समितीवर शिवसेनेची पहिली सभापती होण्याचा मान पूर्वी निमूणकर यांना मिळाला आहे. यावेळी सभापती होण्याची संधी आमदार भास्कर जाधव यांच्यामुळे मिळाली असून, पुढील काळात सर्वांना बरोबर घेऊन काम करणार असल्याचे पूर्वी निमूणकर यांनी सांगितले.
चौकट
आबलोली गावात तिसऱ्यांदा सभापतिपदाचा मान
१९९२ ते १९९५ दरम्यान चंद्रकांत बाईत यांनी सभापतिपद भूषविले. त्यानंतर १९९७ ते १९९८ वृषाली वैद्य यांना सभापती होण्याचा मान मिळाला. आता पूर्वी निमूणकर यांच्या रूपाने आबलोली गावातून तिसरी सभापती म्हणून सर्वाधिक कमी वयातील सभापती म्हणून संधी मिळाली आहे.