माजी मंत्री भास्कर जाधव यांना धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 05:29 AM2018-04-13T05:29:24+5:302018-04-13T05:29:24+5:30
गुहागर नगर पंचायतीत शिवसेनेचा पाठिंबा असलेल्या शहर विकास आघाडीने नगराध्यक्ष पदासह पंचायतीवर सत्ता काबीज केली आहे.
रत्नागिरी : गुहागर नगर पंचायतीत शिवसेनेचा पाठिंबा असलेल्या शहर विकास आघाडीने नगराध्यक्ष पदासह पंचायतीवर सत्ता काबीज केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसला १७ पैकी केवळ एकच जागा जिंकता आल्याने माजी मंत्री आ. भास्कर जाधव यांना मोठा धक्का बसला. पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे राजेश बेंडल हे शहर विकास आघाडीकडून नगराध्यक्षपदी निवडून आले. गुहागरमध्ये शहर विकास आघाडी ९, शिवसेना १, भाजपा ६, राष्ट्रवादी १ असे पक्षीय बलाबल राहिले. देवरुख नगर पंचायत निवडणुकीत अनपेक्षितरीत्या भाजपाने बाजी मारली असून, नगराध्यक्षपदासह ७ जागा जिंकल्या. भाजपाच्या मृणाल शेट्ये नगराध्यक्षपदी विजयी झाल्या. भाजपाला ७, मनसे १, शिवसेना ४, राष्ट्रवादी ३, काँग्रेस १ आणि अपक्षास एक जागा मिळाली.
आजरा ताराराणीकडे : आजरा (जि. कोल्हापूर) : आजरा नगर पंचायतीत अशोकअण्णा चराटी यांच्या नेतृत्वाखालील आजरा शहर विकास आघाडीने वर्चस्व मिळवले. आजऱ्याच्या पहिल्या नगराध्यक्षा म्हणून जोत्स्ना अशोक चराटी विजयी झाल्या. १० जागा शहर विकास आघाडीला मिळाल्या. राष्ट्रवादी-काँगे्रस-शिवसेना आघाडीला केवळ ६ जागांवर समाधान मानावे लागले. तर भाजपा-शिवसेना युतीला केवळ १ जागा मिळाली.