रत्नागिरीतील पावसकर हॉस्पिटलचा परवाना निलंबित, ज्ञानदा पोळेकर यांचा मृत्यू हलगर्जीपणामुळे झाल्याचा रुग्णालयावर ठपका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2018 07:50 PM2018-02-12T19:50:39+5:302018-02-12T19:51:11+5:30

ज्ञानदा प्रणव पोळेकर यांना प्रसुतीनंतर आरोग्य सेवा देण्यात पावसकर हॉस्पिटलच्या डॉक्टर्सनी हलगर्जीपणा केल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. याबाबत रविवारी दुपारनंतर या नर्सिंग होमला भेट देऊन तपासणी करण्यात आली.

Pushkar hospital suspended in Ratnagiri, Jnanadha Polekar died due to deficiency of hospital | रत्नागिरीतील पावसकर हॉस्पिटलचा परवाना निलंबित, ज्ञानदा पोळेकर यांचा मृत्यू हलगर्जीपणामुळे झाल्याचा रुग्णालयावर ठपका

रत्नागिरीतील पावसकर हॉस्पिटलचा परवाना निलंबित, ज्ञानदा पोळेकर यांचा मृत्यू हलगर्जीपणामुळे झाल्याचा रुग्णालयावर ठपका

googlenewsNext

रत्नागिरी - येथील मृत्यू झालेल्या ज्ञानदा प्रणव पोळेकर यांना प्रसुतीनंतर आरोग्य सेवा देण्यात पावसकर हॉस्पिटलच्या डॉक्टर्सनी हलगर्जीपणा केल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. याबाबत रविवारी दुपारनंतर या नर्सिंग होमला भेट देऊन तपासणी करण्यात आली. त्यानंतर ‘बॉम्बे नर्सिंग होम अ‍ॅक्ट’नुसार त्यांना मिळालेला नर्सिंग होम परवाना निलंबित करण्यात आला आहे. तसे आदेशपत्र पावसकर हॉस्पिटलला तत्काळ बजावण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रल्हाद देवकर यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

याबाबत मॅटर्निटी डेथ रिव्ह्यू कमिटीमार्फत सखोल चौकशी केली जाणार आहे. जिल्ह्यातील तज्ज्ञ डॉक्टर्स या समितीवर आहेत. त्यांच्या बैठकीत या विषयावर चर्चा होईल. ही प्रक्रिया सुरूच राहणार आहे. त्यानंतर  या समितीकडून अंतिम निर्णय घेतला जाईल. हा अहवाल आरोग्य संचालकांकडे पाठवला जाईल, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देवकर यांनी दिली. ज्ञानदा पोळेकर (२६, रा. रत्नागिरी) यांचा डॉक्टर्सच्या हलगर्जीपणामुळे रविवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास मृत्यू झाला, असा आरोप ज्ञानदा यांचे पती प्रणव पोळेकर यांनी  केला व त्यानंतर खळबळ उडाली. वैद्यकीय क्षेत्रातील अनागोंदीबाबत यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. 

प्रणव पोळेकर हे एका वृत्तवाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी असून  त्यांची पत्नी ज्ञानदा पोळेकर यांची गेल्याच आठवड्यात आरोग्य मंदिर येथील पावसकर हॉस्पिटलमध्ये प्रसुती झाली होती. त्यांच्यावर प्रसुती शस्त्रक्रिया करण्यात आली होती. याबाबत प्रणव पोळेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानदा यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे शनिवारी दुपारनंतर पुन्हा पावसकर हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी नेण्यात आले. त्यावेळी डॉ. संजीव पावसकर व डॉ. दीपा पावसकर हे दोघेही हॉस्पिटलमध्ये नव्हते. ते बाहेरगावी गेल्याचे सांगण्यात आले. हॉस्पिटलमधील जबाबदार परिचारिकेकडून डॉक्टरना फोनवरुन संपर्क साधण्यात आला. त्यानंतर डॉक्टर नसतानाही ज्ञानदा यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले. आम्ही रुग्णाला अन्यत्र न्यायचे काय, असे विचारले असता, काही गंभीर नाही, असे सांगण्यात आले.

 

मात्र, शनिवारी रात्री ज्ञानदा यांची प्रकृती ढासळली. डॉक्टर्स नसल्याने वेळीच योग्य उपचार होऊ शकले नाहीत, असे पोळेकर यांनी सांगितले. रविवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास पावसकर हॉस्पिटलमधून ज्ञानदा यांना अन्य रुग्णालयात हलविण्यास सांगण्यात आले. तेथे नेल्यानंतर तपासणी केली असता, ज्ञानदा यांचे आधीच निधन झाले असल्याचे दुसऱ्या रुग्णालयातील डॉक्टर्सनी सांगितले. पावसकर हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळेच हे घडल्याचे पोळेकर यांनी म्हटले आहे. 

या घटनेची माहिती मिळताच शहरातील सर्व पत्रकार मारूती मंदिर येथील ‘त्या’ खासगी रुग्णालयात आले. प्रणव पोळेकर कुटुंबियांना हा धक्का सहन होणारा नव्हता. त्यांचे कुटुंबिय व ज्ञानदा यांचे कुटुंबियही रुग्णालयात आले. त्यांना या घटनेची माहिती सांगितल्यानंतर त्यांनी हंबरडा फोडला. रुग्णालयातील वातावरण शोकाकूल झाले. उपचारांबाबत हलगर्जीपणा करणाºया पावसकर हॉस्पिटलच्या डॉक्टर्सबाबत तीव्र प्रतिक्रिया यावेळी उमटल्या. गेल्या आठवडाभरात रत्नागिरीत अशा हलगर्जीपणाच्या चार घटना घडल्याने याबाबत जाब विचारलाच पाहिजे, अशी भूमिका उपस्थित सर्वांनीच मांडली. ज्ञानदा यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टर्सनी जाहीर केल्यानंतर रुग्णालयात रत्नागिरीकरांनी गर्दी केली होती.

रत्नागिरीसह जिल्ह्यातील काही डॉक्टर्स हे शनिवार, रविवार बाहेरगावी जातात. अशावेळी त्या रुग्णालयांमध्ये रुग्णांना वैद्यकीय सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी असून याप्रकरणी शल्यचिकित्सकांनी चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली. 

राजन साळवी, उदय सामंतांनी विचारला जाब

ज्ञानदा पोळेकर यांच्या मृत्यूनंतर रत्नागिरीतील सर्व पत्रकार आणि रत्नागिरीचे आमदार उदय सामंत, राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्यासह शहरवासियांनी रविवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास आरोग्य मंदिर येथील पावसकर हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचारांबाबत झालेल्या हलगर्जीपणाचा जाब विचारला. ज्ञानदा यांच्यावर काय उपचार झाले, याची माहिती विचारली असता, तेथील कारभार पाहणा-या परिचारिकांनी प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे आमदार राजन साळवी हे संतप्त झाले. 

हलगर्जीपणाच्या तीन घटना

वैद्यकीय सेवा देताना गेल्या आठवडाभरात हलगर्जीपणामुळे अशा तीन घटना घडल्याची चर्चा शहरात सुरू होती. त्यामुळे सामान्य माणसांनी कोणाकडे न्याय मागावा, असा सवालही शहरवासियांमधून विचारला जात आहे. 

जिल्हा रुग्णालयात धाव

पावसकर हॉस्पिटलमध्ये हलगर्जीपणाचा जाब विचारल्यानंतर आमदार सामंत व साळवी तसेच पत्रकार यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. या हलगर्जीपणाबाबत कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रल्हाद देवकर यांच्याकडे केली. त्यानंतर डॉ. देवकर यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार या हॉस्पिटलला भेट देऊन वस्तूस्थितीची पाहणी केली. हलगर्जीपणा दिसून आल्याने परवाना निलंबित केल्याचे आदेशपत्र दिले. 

गुहागरमध्ये अंतिम संस्कार

जिल्हा रुग्णालयात विच्छेदन झाल्यानंतर ज्ञानदा प्रणव पोळेकर यांचा मृतदेह सायंकाळी उशिरा  गुहागर येथील घरी नेण्यात आला. तेथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी रत्नागिरीतून अनेक पत्रकार, मान्यवर नेते उपस्थित होते.

सात दिवसांचे बाळ आईविना 

प्रसुतीनंतर अवघ्या सात दिवसांनी ज्ञानदा पोळेकर यांचे निधन झाल्याने त्यांचे ७ दिवसांचे नवजात बाळ आईविना पोरके झाले. या बाळाला रविवारी सकाळीच त्यांच्या कुटुंबियांनी शिवाजीनगर येथील निवासस्थानातून गुहागर येथे हलविले.

सिझरिंगनंतर तिसऱ्या दिवशी दिला डिस्चार्ज

ज्ञानदा पोळेकर यांच्यावर प्रसुती शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर तिसºयाच दिवशी त्यांना घरी जाऊ देण्यात आले हे योग्य आहे काय, असे  विचारता नियमानुसार साधारण प्रसुतीमध्ये तीन दिवसानंतर व सिझर स्थितीत ७ दिवसानंतर डिस्चार्ज दिला जातो, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देवकर यांनी आमदार व लोकप्रतिनिधींना दिली. 

Web Title: Pushkar hospital suspended in Ratnagiri, Jnanadha Polekar died due to deficiency of hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.