भविष्य उजळण्याआधीच पिता-पुत्रांवर घाला

By admin | Published: August 5, 2016 12:47 AM2016-08-05T00:47:41+5:302016-08-05T02:03:43+5:30

आपल्या मुलाला चांगले शिक्षण मिळावे, त्याची प्रगती व्हावी,

Put on fathers and sons before the future is set | भविष्य उजळण्याआधीच पिता-पुत्रांवर घाला

भविष्य उजळण्याआधीच पिता-पुत्रांवर घाला

Next

सुभाष कदम -- चिपळूण --आपला मुलगा शिकावा, खूप मोठा व्हावा, अशी प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. दोन वर्षांनी सेवानिवृत्त होणाऱ्या चालक श्रीकांत कांबळे यांनी हेच स्वप्न उराशी बाळगून आपल्या मुलासह मुंबईकडे जात असताना महाड राजेवाडी येथे काळाने त्यांच्यावर झडप घातली आणि हे स्वप्न काळाच्या उदरात गडप झाले. गुरुवारी सकाळी आंजर्ले येथे कांबळे यांचा मृतदेह आढळून आला आणि अनेकांचे डोळे पाणावले. कांबळे हे मिणचे (ता. हातकणंगले) येथील रहिवासी होते. एस. टी. महामंडळात ३० वर्षे सेवा करून दोन वर्षांनी ते निवृत्त होणार होते. आपल्या मुलाला चांगले शिक्षण मिळावे, त्याची प्रगती व्हावी, या हेतूने त्यांनी सावर्डे पोलीस लाईनसमोर आठ ते दहा वर्षांपूर्वी घर विकत घेतले होते. तेथे पत्नी कमल ऊर्फ सावित्री, मोठा मुलगा मीलन व लहान मुलगा महेंद्रसह ते राहात होते. श्रीकांतला बारावी शास्त्र शाखेत ८१.८५ टक्के गुण मिळाले होते. दोन्ही मुलांना इंजिनिअर करण्याचे स्वप्न कांबळे यांनी उराशी बाळगले होते. अभ्यासात हुशार असणाऱ्या महेंद्रला शिक्षणासाठी व्हीजेटीआय, माटुंगा - मुंबई या महाविद्यालयात प्रवेश मिळाला होता. म्हणून चालक कांबळे यांनी आपली ड्युटी नसताना दुसऱ्या चालकाकडून ही ड्युटी मागून घेतली. शिवाय आपल्याला मुंबईची फारशी माहिती नसल्याने त्याने वाहक विलास देसाई यांनाही बरोबर घेतले. वाहक देसाई यांची त्या दिवशी ड्युटी नव्हती. या दोघांनीही बदली घेऊन ते प्रवास करत होते. अमावास्येचा दिवस होता. बाहेर पाऊस बरसत होता. काळाकुट्ट अंधार होता. नद्या, नाले आक्राळविक्राळ होऊन वाहात होत्या. पोलादपूर एस. टी. स्टॅण्ड सोडल्यावर राजेवाडी फाटा येथे सावित्री नदी पात्राजवळ दबा धरून बसलेल्या काळाने अचानक घाला घातला आणि सावित्रीचा जुना ८८ वर्षांचा ब्रिटिशकालीन पूल क्षणात वाहून गेला. या पुलावरून जयगड - मुंबई बसही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. या बसचे चालक कांबळे, वाहक देसाई व कांबळे यांचा मुलगा महेंद्र हाही पाण्यात गडप झाला.
चालक कांबळे अतिशय सुस्वभावी, शांत व संयमी होते. रस्ते सुरक्षा अभियानात सुरक्षित सेवा केल्याबद्दल त्यांना सुरक्षा बिल्लाही मिळाला होता. महामंडळातील सर्व चालक - वाहकांशी त्याचे सलोख्याचे संबंध होते. सावर्डेत ज्या ठिकाणी ते राहात होते तेथील लोकांशीही त्याचे घरगुती संबंध प्रस्थापित झाले होते. गाडी बेपत्ता झाल्याचे वृत्त समजताच बुधवारी सकाळपासून कांबळे यांच्या सावर्डे येथील निवासस्थानी गर्दी जमली होती. त्यांची पत्नी हंबरडा फोडत होती.
२१ वर्षांचा मीलन आभाळ फाटल्यासारखा स्थितप्रज्ञ होता. भाऊ व वडील बेपत्ता असल्याने त्याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. तो कोणाशी बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता. आसमंतात त्याची नजर भिरभिरत होती. आज सकाळी कांबळेंचा मृतदेह आंजर्ले सागरी किनारी आढळून आला. त्यानंतर त्यांचे पार्थिव चिपळूण आगारात आणून त्यांना सहकारी, कर्मचारी, शासकीय अधिकारी, विविध पक्षांचे पदाधिकारी यांनी अखेरचा निरोप दिला. त्यानंतर त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावाकडे अंत्यविधीसाठी पाठवण्यात आले. वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. परंतु, त्यांच्या १९ वर्षांच्या महेंद्रचा शोध न लागल्याने अनेकांच्या हृदयात घालमेल होती. कांबळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. महेंद्र कुठे आहे, अशी विचारणा त्यांची श्रीकांत यांची पत्नी सावित्री नातेवाईकांकडे करत होती. अश्रू वाहण्यापलिकडे नातेवाईकांकडे कोणतेही उत्तर नव्हते. या पिता-पुत्रावर काळाने झडप घालून एक स्वप्न उद्ध्वस्त केले.

Web Title: Put on fathers and sons before the future is set

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.