रत्नागिरीनजीक एकाचा गोळी घालून खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 12:20 AM2019-04-19T00:20:26+5:302019-04-19T00:20:30+5:30
कोतवडे येथील वेतोशी रोडवर असणाऱ्या घारपुरे वाडी येथे गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास भिकाजी कृष्णा कांबळे यांच्यावर बंदुकीने गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आली आहे.
रत्नागिरी : शहरापासून जवळच असणाऱ्या कोतवडे येथील वेतोशी रोडवर असणाऱ्या घारपुरे वाडी येथे गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास भिकाजी कृष्णा कांबळे यांच्यावर बंदुकीने गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीची धामधूम संपूर्ण जिल्ह्यात सुरु असताना घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून अनेक तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत. ही हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे झाली हे अद्यापही स्पष्ठ झालेले नाही. मात्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हत्याराचा वापर करून हत्या करण्यात आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
मयत भिकाजी कृष्णा कांबळे हे रंगारी होते व ते रंगकामाचे ठेके घेत असत. यातीलच व्यवहारावरून ही घटना घडली असल्याचे देखील बोलले जात आहे. ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी कांबळे दोघा इसमांसोबत बोलत असताना काही ग्रामस्थांनी बघितले होते. या अनोळखी दोन इसमांकडे लाल रंगाची दुचाकी होती अशी देखील कुजबुज ऐकायला मिळत आहे.
वेतोशी येथील भिकाजी कृष्णा कांबळे हे पंचक्रोशीत रंग काम करण्याचे काम करतात. परिसरातील छोटी मोठी घरे, बंगले यांचे रंगकाम ते करत. मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री ते आपल्या घरी जाताना वेतोशी मार्गावरील घारपुरे वाडी नजीक अज्ञात व्यक्तीने रिव्हॉल्व्हरने केलेल्या फायरिंगमध्ये भिकाजी कांबळे यांच्या छातीत गोळी लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले हत्या झालेल्या ठिकाणा जवळून जाणारा मार्ग जंगलमय असल्याने हत्या नेमकी कोणी केली हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
गोळीबाराच्या आवाजामुळे परिसरातील ग्रामस्थ घटनास्थळी एकत्र आले त्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती ग्रामीण पोलिसांना दिली. ग्रामीण पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तत्काळ घटनास्थळी भेट दिली तर पाेलीस उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे घटनास्थळी दाखल झाले.