सेवाव्रत जपणाऱ्या ‘आनंदीच्या लेकीं’चा दर्जेदार कलाविष्कार
By Admin | Published: August 29, 2016 10:08 PM2016-08-29T22:08:16+5:302016-08-29T23:20:14+5:30
महिला वैद्यकीय व्यावसायिक : ‘आनंदीबाई जोशींचा’ जीवन प्रवासही उलगडला; प्रेक्षकांना तीन तास खिळवून ठेवले
शोभना कांबळे -रत्नागिरी ==वैद्यकीय व्यवसायाबरोबरच घरचीही आघाडी तेवढीच समर्थपणे पेलून आपल्यातील कलागुणांना व्यासपीठ मिळावे, त्यातून काही आगळेवेगळे करावे, या हेतूने ‘आय. एम. ए.’ अर्थात ‘आनंदीच्या लेकीं’नी दर्जेदार कलाविष्कार सादर करून प्रेक्षकांना तीन तास खिळवून ठेवले. शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात रविवारी सायंकाळी हा कार्यक्रम झाला.
आय. एम. ए. ही वैद्यकीय व्यावसायिकांची संघटना दरवर्षी सातत्याने असे दर्जेदार कार्यक्रम करीत असते. सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात १८४८मध्ये पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा काढून मुलींना शिक्षणाची कवाडे खुली केली. आणि मग आनंदीबाई जोशी अमेरिकेत जाऊन पहिल्या भारतीय महिला डॉक्टर ठरल्या. आनंदीबार्इंचा वारसा चालवणाऱ्या या ‘आनंदीबार्इंच्या लेकीं’नी त्यांच्याच जीवनावर कार्यक्रम करण्याचे ठरविले. दोन महिन्यांच्या परिश्रमाने ते स्वप्न सत्यातही उतरविले.
कार्यक्रमाचा मुख्य भाग होता तो आनंदीबार्इंचा जीवनप्रवास उलगडून दाखविणारी नाटिका. ‘आनंदी गोपाळ’ या श्री. ज. जोशींच्या पुस्तकावरून ‘आनंदीची कथा’ सादर करण्यात आली. नाट्यरूपांतर आय. एम. ए.च्या अध्यक्षा डॉ. रश्मी आठल्ये यांनी केले, तर डॉ. मेधा गोंधळेकर यांचे दिग्दर्शन लाभले होते. डॉ. प्रज्ञा पोतदार यांनी आनंदीबार्इंचे स्वगत आणि डॉ. ज्योत्स्ना देशपांडे यांनी आनंदीबाई सादर केली. डॉ. मेधा गोंधळेकर, भाग्यश्री गोगटे, सुमेधा करमरकर, कल्पना मेहता, उज्ज्वला कांबळे या साऱ्यांचाच उत्तम अभिनय होता.
डॉ. उज्ज्वला कांबळे यांनी संत बहिणाबाई आणि बहिणाबाई चौधरी यांच्यातील फरक स्पष्ट करतानाच त्यांच्यातील परमेश्वराविषयीच्या ओढीचे साम्य लेखाद्वारे सांगितले. यावेळी त्यांनी बहिणाबार्इंची गाणी तसेच दातांवरील विनोदी कविता सादर केली. डॉ. शेवाळे यांनी बंदिश तसेच दादरा रागातील रचना सादर केली. डॉ. आरती राठोडकर, ज्योत्स्ना देशपांडे, डॉ. मेधा गोंधळकर यांनी कविता सादर केल्या. डॉ. रश्मी आठल्ये यांनी ‘इवलेसे रोप लावियले दारी’ अभंग सादर केला. त्यांच्या ‘कांदा मुळा भाजी...’ या कव्वालीच्या चालीतील अभंगाने प्रेक्षकांना ताल धरायला लावला.
कार्यक्रमाचे आकर्षण ठरली ती दोन फ्यूजन नृत्ये. झाशीच्या राणीच्या वेशातील ‘भाग फिरंगी भाग’ या दुसऱ्या फ्यूजन नृत्यातून महिला डॉक्टरांची घर आणि व्यवसाय करतानाची तारांबळ व्यक्त झाली. कथ्थक, भरतनाट्य आणि बॉलिवूड या तीनही नृत्य प्रकारांचे एकत्रित सादरीकरण. या नृत्याचा शेवट सैराट चित्रपटातील ‘झिंगझिंगाटा’ने करताना प्रेक्षकांनी कार्यक्रम टाळ्या आणि शिट्यांनी तो उचलून धरला.
डॉ. निशिगंधा पोंक्षे यांनी सूत्रसंचालनाची समयोचित आघाडी सांभाळली. केदार लिंगायत तबलासाथ, तर चैतन्य पटवर्धन यांनी हार्मोनियम साथ दिली. विनया परब यांचेही सहकार्य लाभले.
‘आनंदीची जीवनयात्रा’
कार्यक्रमाच्या प्रारंभी आनंदीबाई जोशी यांची पालखी महिला वैद्यकीय व्यावसायिकांनी रंगमंचावर आणली. तसेच या कार्यक्रमादरम्यान ‘आनंदीची जीवनयात्रा’ चित्रफीत दाखवण्यात आली. त्यामुळे पहिल्या भारतीय महिला डॉक्टरची माहिती मिळण्यास मदत झाली.
महिला डॉक्टरांचा सत्कार
कार्यक्रमाचे औचित्य साधून रत्नागिरीत ५० वर्षे वैद्यकीय व्यवसायात कार्यरत असलेल्या डॉ. सुनीता चव्हाण, २० वर्षात सुमारे साडेतीन लाख रूग्णांची तपासणी करणाऱ्या वालावलकर रूग्णालयाच्या डॉ. सुवर्णा पाटील, कोकणात पहिल्यांदाच टेस्ट ट्यूब बेबीचे तंत्र विकसित करणाऱ्या डॉ. तोरल शिंदे, रत्नागिरीतील पहिल्या अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. प्रज्ञा पोतदार यांचा सत्कार करण्यात आला.
महिला डॉक्टरांची खंत
देशात अनेक वैद्यकीय महाविद्यालये झाली. पण, पहिल्या महिला डॉक्टर झालेल्या डॉ. आनंदीबाई जोशी यांच्या नावाने एकही महाविद्यालय निघाले नाही, अशी खंत डॉ. रश्मी आठल्ये यांनी मनोगतातून व्यक्त केली. या संघटनेची ही मागणी आपण प्रशासनापर्यंत नक्कीच पोहोचवू, असे त्यांनी सांगितले.