रत्नागिरीतील कुवारबावला अग्नितांडव; बाजारपेठ बचावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 03:24 PM2018-03-22T15:24:30+5:302018-03-22T15:24:30+5:30
महावितरणच्या कुवारबाव येथील पॉवर हाऊसच्या कुंपणातील गवताने बुधवारी दुपारी ३.३० वाजता पेट घेतला. ही आग वाऱ्यामुळे कुवारबाव बाजारपेठेपर्यंत पोहोचली.
रत्नागिरी : महावितरणच्या कुवारबाव येथील पॉवर हाऊसच्या कुंपणातील गवताने बुधवारी दुपारी ३.३० वाजता पेट घेतला. ही आग वाऱ्यामुळे कुवारबाव बाजारपेठेपर्यंत पोहोचली.
आगीचे हे तांडव महावितरणाच्या वीज जनित्रांसह कुवारबाव बाजारपेठ विळख्यात घेणार अशी भीती निर्माण झाली होती. मात्र, रत्नागिरी नगर परिषदेचा अग्निशामक बंब वेळेत घटनास्थळी पोहोचला. तब्बल दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर अग्निशामकाला ही आग विझविण्यात यश आले. आग नेमकी कोणत्या कारणाने लागली हे समजू शकलेले नाही.
कुवारबाव - मिरजोळे येथे रत्नागिरी - हातखंबा मुख्य मार्गाला लागूनच महावितरणचे उपकेंद्र आहे. या उपकेंद्राच्या आवारात मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. हे गवत पेटल्यानंतर आगडोंब उसळला. कुवारबाव व्यापारी पेठेतील व्यापारी गाळ्यांपर्यंत ही आग पोहोचली. काही प्रमाणात व्यापारी गाळ्यांनाही आगीची झळ बसली. व्यापारी गाळे तसेच महावितरणच्या लोखंडी कुंपणाच्या बाहेर जवळच असलेल्या इमारती, बंगले यांच्यापर्यंत आगीचे तांडव पोहोचले.
या प्रकाराने भयभीत झालेल्या व्यापाऱ्यांनी मिळेल त्या भांड्यातून पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला. जवळच्या एका बंगल्याजवळ आग पोहोचताच त्या कुटुंबियांनी धाव घेत पंपाद्वारे विहिरीचे पाणी फवारत आगीचे संकट थोपविण्याचा प्रयत्न केला.
उपकेंद्राच्या आवारातील आतील भागात वाऱ्यामुळे वेगात पसरत गेल्याने आतील विद्युत जनित्रे आगीच्या टप्प्यात आली होती. मात्र, अग्निशामक बंब आतील भागात नेवून ही आग विझविण्यात आली.
जोराचा वारा असल्याने आग विझविल्यानंतर काहीवेळात पुन्हा भडकत होती. घरांप्रमाणेच उपकेंद्राशेजारी काही अपार्टमेंट्सही आहेत. वाऱ्यामुळे तेथपर्यंत आग पसरण्याची भीती होती. मात्र, अग्निशामक दल व ग्रामस्थांनी शर्थ केल्याने ही आग आटोक्यात आणणे शक्य झाले.