कोरोना काळात सव्वातीन लाख नवीन वीजजोडण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:21 AM2021-06-20T04:21:54+5:302021-06-20T04:21:54+5:30
रत्नागिरी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी युध्दपातळीवर कार्यरत राहून महावितरणने सव्वातीन लाख नवीन वीजजाेडण्या कार्यान्वित ...
रत्नागिरी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी युध्दपातळीवर कार्यरत राहून महावितरणने सव्वातीन लाख नवीन वीजजाेडण्या कार्यान्वित केल्या आहेत. मार्च महिन्यात ६६,३१०, एप्रिलमध्ये १,४४,६५१ व मे मध्ये १,०३,४४८ अशा उच्च व लघुदाबाच्या तब्बल ३ लाख १४ हजार ४०९ नवीन वीजजोडण्या कार्यान्वित केल्या आहेत.
गतवर्षी लॉकडाऊनमुळे वीजमीटरचा तुटवडा निर्माण झाला होता. महावितरणने पुरवठादारांना सिंगल फेजचे १८ लाख तर थ्री फेजचे १ लाख ७० हजार नवीन वीजमीटरच्या पुरवठ्याचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे आतापर्यंत सिंगल व थ्रीफेजचे ९ लाख ५३ हजार नवीन वीजमीटर उपलब्ध झाले असून, ते पुणे, नागपूर, औरंगाबाद व कल्याण प्रादेशिक कार्यालयांना पाठविण्यात आले आहेत.
महावितरणचे अभियंता व कर्मचारी कोरोना काळात युध्दपातळीवर कार्यरत आहेत. तसेच तातडीच्या आवश्यकतेनुसार ऑक्सिजन प्लांट, नवीन कोविड रुग्णालये, विलगीकरण कक्ष, लसीकरण केद्रांना केवळ २४ ते ४८ तासांत नवीन वीजजोडणी किंवा वाढीव वीजभार देण्यात आला. कोरोनाचे नियम पाळून दैनंदिन ग्राहकसेवा सुरु ठेवण्यात आली आहे.
मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यांच्या कालावधीत उच्चदाब वर्गवारीमध्ये औद्योगिक १७९, वाणिज्यिक २४, कृषी ७ आणि इतर ४० अशा एकूण २५० नवीन वीजजोडण्या तर लघुदाब वर्गवारीमध्ये घरगुती २ लाख ३३ हजार ४२७, वाणिज्यिक ३८ हजार २४, औद्योगिक ६,६५०, कृषी ३१ हजार ४७५, सार्वजनिक पाणी पुरवठा योजना ३८३ व इतर ४,२०० अशा एकूण ३ लाख १४ हजार १५९ नवीन वीजजोडण्या कार्यान्वित केल्या आहेत.
महावितरणने सिंगल व थ्री फेजच्या १९ लाख ७० हजार नवीन वीजमीटरचा पुरवठा करण्याच्या सूचना फेब्रुवारीमध्ये दिल्या होत्या. त्यामुळे नवीन वीजमीटरचा पुरवठा सुरळीत झाला आहे. आतापर्यंत सिंगल फेजचे ८ लाख ६८ हजार आणि थ्री फेजचे ८५ हजार मीटर उपलब्ध झाले असून, ते प्रादेशिक कार्यालयांना पाठविण्यात आले आहेत. कोकण प्रादेशिक कार्यालयाला सिंगल फेज ३ लाख २४ हजार व थ्री फेजचे २५ हजार ७८७ नवीन वीजमीटर देण्यात आले आहेत.