सुखटणकर यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह
By admin | Published: March 17, 2016 11:01 PM2016-03-17T23:01:31+5:302016-03-17T23:39:17+5:30
डॉ. संजय देशमुख : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीकडून मागवला खुलासा
रत्नागिरी : गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या प्राध्यापक पदाच्या नियुक्ती कागदपत्रांमध्येच संदिग्धता आढळल्याने याबाबतचा खुलासा संस्थेकडून होईपर्यंत विद्यापीठाने त्यांच्या या मान्यतेला स्थगिती दिली आहे. तसेच त्यांच्याकडे असलेल्या प्रभारी प्राचार्यपदालाही स्थगिती देण्यात आल्याची माहिती मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली.डॉ. देशमुख रत्नागिरी, सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह््यांतील प्राचार्यांसमवेत होणाऱ्या तीन महिन्यांच्या आढावा बैठकीसाठी रत्नागिरीत आले होते. यावेळी सुमारे ५७ महाविद्यालयांचे प्राचार्य, उपप्राचार्य उपस्थित होते. याबाबत माहिती देताना डॉ. देशमुख म्हणाले की, आज देवरूख येथील महाविद्यालयात नॅकची प्रक्रिया सुरू असल्याने त्यासाठीही उपस्थित राहणार असल्याचे सांगितले. आत्तापर्यंत ४२ महाविद्यालयांना आपण भेटी दिल्या, त्यापैकी १४ महाविद्यालये ही नॅक मानांकनप्राप्त होती. मुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या ६७९ महाविद्यालयांपैकी ५४ महाविद्यालयांना ‘अ’ श्रेणी मिळाल्याची माहिती डॉ. देशमुख यांनी दिली.
पूर्वी उशिरा होणाऱ्या परिक्षांचेही वेळापत्रक बदलून ते अलिकडचे केले आहे. याचबरोबर इतरही अभिनव बदल विद्यापीठाने केले असल्याचे त्यांनी सांगितले.
रत्नागिरीतील गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुखटणकर यांच्या प्राध्यापकाच्या नियुक्तीवेळी सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये तफावत आढळली आहे. त्यामुळे याबाबत संस्थेकडून खुलासा मिळत नाही, तोपर्यंत त्यांच्या प्राध्यापक आणि त्यांच्याकडे असलेल्या प्रभारी प्राचार्यपदालाही स्थगिती देण्यात आली आहे. याबाबतची उत्तरे संस्थेकडून मिळत नाहीत, तोपर्यंत प्राचार्यपदाची जबाबदारी ज्येष्ठ प्राध्यापकाकडे देण्यात यावी, असेही संस्थेला विद्यापीठाकडून कळविण्यात आल्याची माहिती डॉ. देशमुख यांनी यावेळी दिली. (प्रतिनिधी)
स्कील डेव्हलपमेंट
‘मेक इन इंडिया’ अंतर्गत झाराप येथे शासनाने २०० एकर जमीन देऊ केली आहे. त्यावर कोकणच्या दृष्टीने आवश्यक कौशल्ये विकसीत करणारे अभ्यासक्रम सुरू करण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे.
कोकण रेल्वेच्या सहकार्याने एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून रत्नागिरीत रेल्वे रिसर्च सेंटर सुरू करणार आहे. मंत्रालयाकडून पहिल्याच टप्प्यात एक कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे.
रशिया आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठात ‘युरल फेडरेशन युुनिव्हर्सिटी’च्या माध्यमातून आॅनलाईन एमबीएची सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.