पूल बांधणीचा प्रश्न अद्याप ‘जैसे थे’
By admin | Published: December 17, 2014 09:44 PM2014-12-17T21:44:42+5:302014-12-17T23:00:39+5:30
राजापूर तालुका : शासनाच्या लालफितीचा बसला फटका...
राजापूर : शासनाची अनास्था व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष यामुळे राजापूर तालुक्यातील काही पुलांच्या बांधणीचा प्रश्न अद्याप लाल फितीच्या कारभारात अडकून पडला आहे.
तालुक्यातील बागवेवाडीसह डोंगर - गोवळ या पुलासह कोसळलेला ओझरचा ब्रीज आणि अर्धवट अवस्थेत असलेला राजापूर ते कोंढेतड दरम्यानचा पूल या सर्वांच्या कामात जरासुद्धा प्रगती झालेली नाही. त्यामुळे त्या परिसरात राहणाऱ्या जनतेच्या समस्या काही सुटलेल्या नाहीत.
तालुक्यातील बागवेवाडी हा ओशिवळे गावाचा महसूल भाग म्हणून ओळखला जातो. अर्जुना नदीपलीकडचा भाग डोंगराळ असून, त्या गावाकडे जाण्यासाठी पक्क्या स्वरुपाचा मार्ग नाही. त्यामुळे अर्जुना नदीवर पूल बांधण्यात यावा, अशी मागणी तेथील ग्रामस्थ सातत्याने करीत आहेत. त्याबाबत शासनाकडे लेखी स्वरुपात पाठपुरावा केला गेला. त्यानुसार नवीन पुलाला मंजुरीदेखील मिळाली. त्याला दोन वर्षे लोटली, तरी पुढील काहीच हालचाल झालेली नाही. परिणामी समस्त बागवेवाडीतील ग्रामस्थ मंजूर झालेला पूल केव्हा मार्गी लागणार याच्या प्रतीक्षेत आहेत.
पावसाळ्याच्या हंगामात तर बागवेवाडीतील ग्रामस्थांना गैरसोयींचा सामना करावा लागतो. एक लोखंडी साकव तेवढाच त्यांचा आधार आहे. कुणी रुग्ण असेल तर त्याला उपचारार्थ नेताना अनंत अडचणी येतात. ही समस्या केव्हा दूर होणार याचीच चिंता सर्व ग्रामस्थांना लागून राहिली आहे.
चार वर्षांपूर्वी पावसाळी दिवसात ओझरकडे जाणारा पूल अचानक कोसळून पडला होता. त्यानंतर त्या पुलाच्या पुनर्बांधणीसाठी संबंधित बांधकाम विभागाकडे अनेक वेळा पत्रव्यवहार करण्यात आले. पण, अजून पूल काही मार्गी लागलेला नाही. ओझरकडे जाण्यासाठी केवळ एकच मार्ग आहे. त्यावरील पूल कोसळताच पर्यायी मार्ग तयार करण्यात आला असला तरी तो सुरक्षित नाही. पावसाळी दिवसात मार्गावरील एका मोरीला पुराचा वेढा पडत असतो. त्यामुळे वाहतूक ठप्प होते. दैनंदिन खरेदीसह, शालेय विद्यार्थी, रुग्ण यांना ओणी, राजापूर व आजूबाजूला जावे लागते. पुलाची अद्याप बांधणी न झाल्याने बागवेवाडी ग्रामस्थांप्रमाणेच ओझरवासीयांच्या समस्या कायम राहिल्या आहेत.
अशीच समस्या डोंगर व गोवळ दरम्यान राहणाऱ्या ग्रामस्थांची बनली आहे. अर्जुना नदीकाठच्या दुतर्फा असणाऱ्या या दोन्ही गावांचा एकमेकांशी चांगला संपर्क असतो. पावसाळी दिवसात तरीच्या सहाय्याने ये-जा करावी लागते. सुमारे हजार लोकसंख्या असलेल्या गोवळमधील शालेय विद्यार्थी विलये हायस्कूलला जातात. शिवाय रेशनिंगसह दैनंदिन खरेदीसाठीही डोंगर व विलयेला जावे लागते. गोवळ परिसरातील भाजीपालादेखील डोंगरमधील बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवला जातो. तथापी या सर्वांना अर्जुना नदीवरील नसलेला पूल अडथळा ठरतो. त्यामुळे हा पूलदेखील कधी मार्गी लागणार, याची प्रतीक्षा उभय ग्रामस्थांना लागून राहिली आहे.
शहरानजीक कोंढेतडवासीयांची अनेक वर्षांची समस्या दूर करण्यासाठी अर्जुना नदीवरील पुलाचे काम सुरु झाले. मात्र, मागील दोन वर्षांत अत्यंत कुर्मगतीने पुलाचे काम सुुरू आहे. ते पूर्णत्त्वाला जायला अजून किती वर्षे लागतील, त्याचा नेम नाही.
रायपाटण गावातील अर्जुना नदीपलीकडील बागवाडी, कदमवाडी, बौद्धवाडी व खाडेवाडी असा सुमारे हजारांहून अधिक लोकवस्ती असलेल्या वाड्यांसाठी पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून रस्ता तयार करण्यात आला असला तरी नदीवर पूल नसल्याने वाहतुकीचा प्रश्न जटील बनला आहे. त्यामुळे इथेदेखील ग्रामस्थांना अन्य गावांप्रमाणे त्याच अडचणींचा सामना करावा लागतोय.
मागील अनेक वर्षे या समस्या कायम आहेत. स्थानिक ग्रामस्थांच्या उठावानंतरही त्या सुटलेल्या नाहीत. प्रत्येकवेळी अर्ज, निवेदनाद्वारे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न होतो. शासनाने त्याकडे जाणीवपूर्वक पाहिले नाही तर आमच्या लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळे चार ते पाच गावच्या ग्रामस्थांवर पुलांअभावी समस्यांच्या चक्रव्युहातच अडकून पडण्याची वेळ आली आहे. (प्रतिनिधी)
जीर्ण पुलांची डागडुजी रखडली
समस्त कोंढेतडवासियांना शिक्षणासह सर्व मूलभूत गरजांंच्या पूर्ततेसाठी राजापूर शहरात यावे लागते. पावसाळी दिवसात येथे तरीचा वापर केला जातो. त्यामुळे येथील पुलाचे काम वेळीच होणे फार आवश्यक आहे. अन्यथा ग्रामस्थांची ससेहोलपट होणार आहे.
अर्जुना नदीवरील पुलाचे सर्वेक्षण करून त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा आराखडा तयार झाला होता. पण तो धूळ खात पडला आहे.
राजापूर तालुक्यात अनेक जीर्ण पूल आहेत. ब्रिटीशकालीन पूल असूनही त्याची अद्याप डागडुजी करण्यात आलेली नाही. त्यामुळे हे पूल कमकुवत झाले असून वाहतुकीस अयोग्य ठरत आहेत. याकडे राज्श शासन लक्ष पुरवत नसल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. ब्रिटीशकालीन पुलांची दुरुस्ती नाही तसेच नवीन पुलांचे काम नाही, त्यामुळे राजापूर तालुक्यातील ग्रामीण भाग विकासाच्या मार्गात किती मागे आहे, याचेच प्रत्यंतर येते.