वर्गदुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर
By admin | Published: May 22, 2016 12:45 AM2016-05-22T00:45:44+5:302016-05-22T00:46:22+5:30
जिल्हा परिषद : तब्बल १ हजार ९ धोकादायक वर्गखोल्या
रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील ५७६ प्राथमिक शाळांच्या १००९ वर्गखोल्या नादुरुस्त झाल्या असून, धोकादायक स्थितीत आहेत. या वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी सुमारे ११ कोटी १४ लाख ५० हजार रुपयांची आवश्यकता आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून या वर्गखोल्यांना अपुरे अनुदान मिळत असल्याने या वर्गखोल्यांची दुरुस्ती रखडली आहे. रस्त्यांच्या कामासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मिळत असताना शाळांच्या दुरुस्तीसाठी अनुदान का नाही? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
दरवर्षी वर्गखोल्या दुरुस्तीचा हा आलेख वाढत चालल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शासनाकडून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात येत आहे. त्यामध्ये शिक्षकांना प्रशिक्षण तसेच नवनवीन उपक्रम राबविण्यावर हा खर्च करण्यात येतो. मात्र, धोकादायक शाळांतील वर्गखोल्यांच्या दुरुस्तीला शासनाकडून पुरेसे अनुदान दिले जात नसल्याने पालकवर्गामध्येही तीव्र नाराजी आहे.
या शाळांच्या इमारतीमधील वर्गखोल्यांच्या भिंतींना तडे गेले आहेत तर अनेक वर्गखोल्यांची छप्परे मोडकळीस आल्याने त्यांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील १००९ वर्गखोल्या नादुरुस्त झाल्या आहेत. पावसाळा तोंडावर आला असतानाही या वर्गखोल्याच्या दुरुस्तीकडे जिल्हा परिषद प्रशासनाने लक्ष पुरवलेले नाही. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.
या नादुरुस्त वर्गखोल्यांची वेळेत दुरुस्ती होणे आवश्यक आहे. ती न झाल्यास पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वर्गखोल्यांमध्ये पाण्याची गळती लागून विद्यार्थ्यांची वह्या, पुस्तके भिजणार आहेत.
मागील आर्थिक वर्षामध्ये डीपीडीसीतून वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी १ कोटी १० लाख रुपये तर सेसफंडातून ५० लाख रुपये असे एकूण १ कोटी ६० लाख रुपयांचे अनुदान जिल्हा परिषदेला प्राप्त झाले होते. त्यातून १५० वर्गखोल्यांची दुरुस्ती करण्यात आली. उर्वरीत ५७६ प्राथमिक शाळांमधील १००९ वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी ११ कोटी १४ लाख ५० हजार रुपयांची आवश्यकता आहे.
पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे या वर्गखोल्यांची दुरुस्ती पावसाळ्यापूर्वी होणे आवश्यक होते. मात्र, मागणी करुनही अनुदान न मिळाल्याने या धोकादायक वर्गखोल्यांमध्येच विद्यार्थ्यांना विद्येचे धडे घ्यावे लागणार आहेत.(शहर वार्ताहर)