धरणांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

By admin | Published: March 18, 2016 10:33 PM2016-03-18T22:33:51+5:302016-03-18T23:43:12+5:30

उपाययोजनांची गरज : राजापूर तालुक्यातील माय-लेकीच्या मृत्यूनंतर धोका कायम

The question of dam safety is on the anvil | धरणांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

धरणांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Next

राजापूर : ओझर धरणावर पाणी आणण्यासाठी गेलेल्या माय-लेकींचा पाय घसरल्याने पाण्यात पडून मुत्यू झाल्यानंतर राजापूर तालुक्यातील अनेक उघड्या धरणांचा प्रश्न पुढे आला आहे. याबाबत शासन या उघड्या धरणांबाबत कोणती उपाययोजना करणार? असा सवाल जनसामान्यांतून विचारला जात आहे.
राजापूर तालुक्यात सुमारे पंधरा ते वीस धरण प्रकल्प असून, काही पूर्ण तर काही अपूर्ण आहेत. मात्र, यापैकी एकाही प्रकल्पाला बंदिस्त करण्यात आलेले नाही. हे सर्व धरण प्रकल्प उघडेच आहेत. त्यामुळे तेथे कुणीही कधीही व केव्हाही जाते हे अनेकदा दिसुन आले आहे. अशा उघड्या धरणांमुळे सुरक्षितताच धोक्यात आली आहे.
पाणीटंचाईच्या काळात जेथे अशी धरणे आहेत तेथे पाणी भरण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील ग्रामस्थ पाण्यासाठी याठिकाणी येतात. अशावेळी कोणताही विचार न करता सरळ हे ग्रामस्थ धरणात उतरतात. यापूर्वी तालुक्यात धरणात पडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, तरीही याबाबत संबंधित विभागाने कोणतीही उपाययोजना न केल्यामुळे आणखी दोघांना जीव गमवावा लागला आहे.
राजापूर तालुक्यात असे एकही धरण नाही की जे पूर्ण बंदीस्त आहे. याबाबत शासनाचे नक्की धोरण काय हे देखील स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे अशी धरणे उघडी ठेवायची का? जर ती उघडी ठेवायची असतील, तर तेथील सुरक्षिततेची हमी कोण देणार? याचे उत्तर आता जनतेला मिळणे आवश्यक आहे. या धरणांतील जॅकवेल पूर्णंत: उघड्या असून, त्या बंदिस्त करणे आवश्यक आहे. काही प्रकल्प बांधून वीस ते पंचवीस वर्षापेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. त्यामुळे तेथील लोखंडी साहित्य व पत्रे गंजून गेले आहेत. अशा धरणांवर पाटबंधारे विभागाने आपला कर्मचारीही ठेवलेला नाही. केवळ माणसेच नाहीत तर पाळीव जनावरेही अशा उघड्या धरणांवर पाणी पिण्यासाठी जातात. तालुक्यातील एकाही धरणातून कालवे काढण्यात न आल्याने ज्या प्रमाणात येथील क्षेत्र सिंंचनाखाली यायला हवे होते ते अद्याप आलेले नाही.
काहीवेळा तर पिण्यासाठीही पाणी मिळत नाही. पण धरणात साठणारा तुडुंब पाणीसाठा एक तर तसाच शिल्लक राहतो किंंवा उन्हाळ्यात सोडून दिला जातो. राजापूर तालुक्यातील माणसे पाण्याअभावी नाहीत तर पाण्यात बुडून मृत्यूमुखी पडत आहेत, हेच धक्कादायक चित्र पहावयास मिळत आहे. ओझरच्या घटनेनंतर शासन अशी सर्व धरणे बंदिस्त करणार का? हाच खरा सवाल आहे. (प्रतिनिधी)


ओझर परिसरच सुन्न : माय-लेकीवर एकाचवेळी अंत्यसंस्कार
ओझर धरणात बुडून मृत्यूमुखी पडलेल्या माय-लेकीवर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाचवेळी माय-लेकीवर झालेल्या अंत्यसंस्काराने संपूर्ण ओझर परिसरातील ग्रामस्थांत दु:खाचे वातावरण होते. ओझर धरणात बुडून मृत्यू पावलेल्या गावातील मनिषा महादेव कोकरे व त्यांची मुलगी संगिता या आपल्या घरापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या ओझर धरणावर पाणी भरण्यासाठी गेल्या होत्या. यापूर्वीही कोकरे कुटुंबातील माणसे त्या धरणावर पाणी भरण्यासाठी जात असत. मात्र, बुधवार हा त्यांच्यासाठी घातवार ठरला व धरणातून पाणी भरताना पाय घसरलेल्या आपल्या मुलीला वाचवताना आईला देखील आपले प्राण गमवावे लागले. बुधवारी रात्रीच दोन्ही मृतदेहांचे शवविच्ेदन करण्यात येऊन ते नातेवाईकांच्या ताब्यात दण्यात आले. गुरुवारी त्या मृतदेहांवर एकाचवेळी अंतिम संस्कार करण्यात आले.

धरण प्रकल्प
तालुक्यात धरण प्रकल्पांची कामे सुरू आहेत. सुमोर १५ ते २० धरण प्रकल्पांचे काम करण्यात आले आहेत. यातील काही प्रकल्प पूर्ण झाले आहेत. तर काही अद्यापही अपूर्णावस्थेत आहेत. याठिकाणी अपघातांचा धोका कायम आहे.

Web Title: The question of dam safety is on the anvil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.