नव्या रेल्वेमार्गाला त्वरित प्रारंभ

By Admin | Published: August 21, 2016 10:38 PM2016-08-21T22:38:05+5:302016-08-21T22:38:05+5:30

सुरेश प्रभू : ‘जयगड-भोके, रोहा-दिघी, चिपळूण-कराड’चा समावेश

Quick Start for New Railroad | नव्या रेल्वेमार्गाला त्वरित प्रारंभ

नव्या रेल्वेमार्गाला त्वरित प्रारंभ

googlenewsNext

खेड : कोकणचा सर्वांगिण विकास करण्यासाठी जयगड ते भोके, रोहा ते दिघी आणि चिपळूण ते कराड या नव्या रेल्वे मार्गांना मंजुरी दिली असून, या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे, तसेच रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील ५ तालुके सागरी मार्गाने जोडण्यात येणार आहेत, नजीकच्या काळात कोकणात रेल्वे आणि सागरी मार्गाचे जाळे तयार होणार असल्याचे केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले.
खेड तालुक्यातील कळंबणी येथे नव्या रेल्वे स्थानकाचे भूमिपूजन सुरेश प्रभू यांच्या हस्ते रविवारी सायंकाळी ५.१५ वाजता रिमोटद्वारे करण्यात आले. यानिमित्त भरणे येथील पाटीदार भवन येथे आयोजित कार्यक्रमामध्ये प्रभू बोलत होते. या रेल्वे स्थानकासाठी ९ कोटी ५५ लाखांचा खर्च होणार आहे. कळंबणी खुर्द, कळंबणी बुद्रुक, उधळे खुर्द व उधळे बुद्रुक, चिंचवली, आपेडे, बोरघर, वावे या गावांना नवीन स्थानकाचा लाभ होणार आहे. यावेळी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते, भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने, आमदार संजय कदम, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम, जिल्हा परिषद अध्यक्ष तुकाराम गोलमडे, माजी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, उपजिल्हाप्रमुख शंकर कांगणे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजा बेलोसे, खेडचे सभापती चंद्रकांत कदम उपस्थित होते.
कोकण विकासाचा मोठा बॅकलॉग आणि येथील जनतेच्या अपेक्षांचा बॅकलॉग मी भरून काढणार आहे. केंद्रीय मंत्री अनंत गीते व आपण स्वत: कोकणातील खासदार आहोत.़ आता नसलो तरीही मोदी यांनी आपल्याला रेल्वे मंत्री केले आणि पुन्हा कोकणची जबाबदारी टाकली, मला समाधान वाटले.
कोकणात सध्या ११ नवी रेल्वे स्थानके मंजूर केली असून, या कामाचे भूमिपूजन तर काही कामांची उद्घाटने केली आहेत. खेडमधून अनेकांनी कोकण रेल्वेच्या जलद गाड्यांना खेड येथे थांबा मिळण्यासाठी केलेल्या मागणीवर अनंत गीते व आम्ही एकत्र बसून अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करू व निदान दोन गाड्यांसाठी थांबा निश्चित करणार असल्याचे आश्वासन दिले.
पूर्वीच्या एका दिवसाला रेल्वेचे ४ किमीचे रस्ते तयार करण्याच्या गतीच्या तुलनेत आता १९ किमी गती वाढवली असून, या नव्या गतीमुळेच कोकण रेल्वेची अनेक कामे मार्गी लागणार असल्याचे सांगितले. रेल्वेतील नोकऱ्या, परीक्षा आणि कामांचे ई - टेंडरिंग हे सर्व आता आॅनलाईन करण्याचा आपला प्रयत्न आहे. लवकरच या कामाला यश मिळणार असल्याचे ते म्हणाले. यापूर्वीची रेल्वेची प्रतिवर्षी ४० हजार कोटी रूपयांची कामे होत होती. आपण रेल्वे मंत्री झाल्यानंतर हा वेग वाढविला आहे. सध्या १ लाख २१ हजार कोटी रुपयांची कामे रेल्वेची होत आहेत, असे ते म्हणाले.
कोकणात होऊ घातलेल्या रेल्वेच्या ३० हजार कोटींच्या कामामध्ये फडणवीस यांनी १० हजार कोटीची मदत देणार असल्याचे सांगितले असून, कोकण विकासात हा मोठा दिलास मिळाला आहे. यावेळी केंद्रीय अवजड व उद्योगमंत्री अनंत गीते यांनी सूरेश प्रभू यांच्यासमवेत मंत्रालयात लवकरच एक बैठक घेणार असून, यामध्ये खेड रेल्वे स्थानकात ४ जलद गाड्यांच्या थांब्याबाबत लवकरच विचारविनिमय करणार असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)
पत्र एकत्र केली अन् कामाला लागलो : प्रभू
याअगोदर अनेक रेल्वेमंत्री होऊन गेले. या कोकणातील जनतेने कोकण रेल्वेबाबत अनेक निवेदने व पत्र दिली होती. ही पत्र त्यावेळी एका बाजूला सारण्यात आली होती. त्यावेळी एकही काम होत नव्हते. आपण रेल्वेमंत्री झाल्यानंतर ही सर्व पत्र शोधून काढली. अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी न पटणारी उत्तरे दिली. ती सारी पत्र एकत्र केली आणि कोकण रेल्वेबाबतच्या सर्व अडचणी टप्प्याटप्प्याने दूर करण्याच्या हेतूने प्रयत्न करू लागलो आहे.

Web Title: Quick Start for New Railroad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.